पाचव्या व सहाव्या मार्गासाठी मध्य रेल्वेसमोर पर्याय

मध्य रेल्वे मार्गावरील मेल-एक्सप्रेसबरोबरच लोकल प्रवास सुकर होण्यासाठी बनविल्या जाणाऱ्या पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गासाठी परळ ते सीएसएमटी दरम्यान अनेक अडथळ्याचा सामना मध्य रेल्वेला करावा लागत असून जागेअभावी सॅण्डहर्स्ट रोड स्थानक ते भायखळा स्थानकापर्यंतचा रेल्वेमार्ग उन्नत (एलिवेटेड) करण्याचा पर्याय रेल्वेच्या वतीने आजमावला जात आहे.

पाचव्या व सहाव्या मार्गाचे सध्या कुर्ला ते परळ आणि परळ ते सीएसएमटी या टप्प्यातील काम बाकी आहे. कुर्ला स्थानकापर्यंत सध्या पाचवा ते सहावा मार्ग आहे. त्यानंतर अप दिशेला सीएसएमटीपर्यंतच्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न आहे. पाचव्या-सहाव्या मार्गासाठी सीएसएमटी स्थानकातील हार्बर मार्ग पूर्णत: सीएसएमटीच्या शेवटच्या फलाटाकडील पीडीमेलो रस्त्याच्या दिशेला स्थलांतरित केला जाईल. या ठिकाणी हार्बर स्थानक उन्नत बांधण्यात येईल. ते बांधतानाच थेट डॉकयार्ड स्थानकापर्यंतचा मार्गही उन्नत करण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकातील सध्याचे हार्बरवरील एक आणि दोन नंबर फलाट हे मुख्य मार्गाचे एक आणि दोन नंबर धीमे फलाट म्हणून ओळखले जातील. तर तीन आणि चार नंबर फलाट हे मुख्य मार्गाचे जलद मार्गाचे फलाट व पाचव्या आणि सहाव्या नंबरचे फलाट हे मेल-एक्स्प्रेससाठी वापरले जाणार आहेत.

रेल्वेला भायखळा स्थानकात पाचव्या, सहाव्या मार्गासाठी जागा करण्यात अनेक अडचणी येत आहेत. भायखळा स्थानकामध्ये अप (सीएसएमटी दिशेला) जलद मार्गाच्या दिशेच्या बाहेरच जागा उपलब्ध असून या ठिकाणी पाच ते सहा बांधकामेही आहेत. ही बांधकामे हटवतानाच ओव्हरहेड वायरसह अनेक मोठी तांत्रिक कामे करण्याची योजना आहे. मात्र ती करताना बरेच मोठे बदल करावे लागतील आणि काही तांत्रिक अडचणीही येण्याची शक्यता आहे. हे पाहता रेल्वेकडून भायखळा स्थानकामधील धीम्या मार्गावरील एक नंबर फलाटच उन्नत करण्याचा पर्यायही समोर ठेवला आहे.

सॅण्डहर्स्ट रोड (हार्बरवरील) ते भायखळापर्यंत उन्नत मार्ग करून त्यानंतर तो खाली चिंचपोकळी स्थानकाला जोडण्याचा विचार असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यामुळे पाचव्या व सहाव्या मार्गाला स्थानकामधील जागा उपलब्ध होईल आणि लोकल मार्गातही अडथळा दूर होईल, असे सांगण्यात आले. या बदलामुळे सध्याचा भायखळा स्थानकामधील एक नंबर आणि दोन नंबर फलाट हा जलद लोकलसाठी वापरला जाईल व तीन आणि चार नंबर फलाट मेल व एक्स्प्रेससाठी वापरण्याचा विचार आहे.