३० व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहर उमटवत प्रथम क्रमांक पटकावला. सुधीर भट थिएटर्सच्या ‘अनन्या’ या नाटकाने दुसरा तर त्रिकुट नाट्य संस्थेच्या ‘वेलकम जिंदगी’ या नाटकाने तिसरा क्रमांक पटकावला. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ही माहिती दिली.
त्याचबरोबर दिग्दर्शनासाठीचे प्रथम पारितोषिक प्रताप फड (अनन्या), व्दितीय पारितोषिक प्राजक्त देशमुख (संगीत देवबाभळी), तृतीय पारितोषिक स्वप्नील बारस्कर (अशीही श्यामची आई) यांना मिळाले. तर नाट्यलेखनालाठी प्रथम प्राजक्त देशमुख (संगीत देवबाभळी), व्दितीय अजित दळवी (समाजस्वास्थ) आणि तृतीय चैतन्य सरदेशपांडे (माकड) यांना मिळाले. तसेच उत्कृष्ट अभिनयासाठीचे पारितोषिक (पुरुष कलाकार) राहुल शिरसाट (माकड), सिध्दार्थ बोडके (अनन्या), अतुल पेठे (समाजस्वास्थ), मकरंद अनासपुरे (उलट सुलट), भरत जाधव (वेलकम जिंदगी) तर (स्त्री कलाकार) सोनाली मगर (माकड), शुभांगी सदावर्ते (संगीत देवबाभळी), अतिशा नाईक (अशीही श्यामची आई), ऋतुजा बागवे (अनन्या), शिवानी रांगोळे (वेलकम जिंदगी) यांनी पटकावले आहे.
त्याचबरोबर तांत्रिक पारितोषिकांमध्ये (प्रकाश योजना) प्रथम, प्रफुल्ल दिक्षित (संगीत देवबाभळी, व्दितीय भूषण देसाई (अनन्या), तृतीय राजन ताम्हाणे (वेलकम जिंदगी). (नेपथ्य) प्रथम संदेश बेंद्रे (अनन्या), व्दितीय प्रदिप मुळे (संगीत देवबाभळी), तृतीय प्रसाद वालावलकर (अशीही श्यामची आई). (संगीत दिग्दर्शन) प्रथम आनंद ओक (संगीत देवबाभळी), व्दितीय समीर साप्तीकर (अनन्या), तृतीय अभिजित पेंढारकर (अशीही श्यामची आई). (वेशभूषा) प्रथम महेश शेरला (संगीत देवबाभळी), व्दितीय माधुरी पुरंदरे (समाजस्वास्थ), तृतीय चैताली डोंगरे (वेलकम जिंदगी). (रंगभूषा) प्रथम सचिन वारीक (संगीत देवबाभळी), व्दितीय शरद सावंत व सागर सावंत (वेलकम जिंदगी) तर तृतीय पारितोषिक संदीप नगरकर (अशीही श्यामची आई) या कलाकारांनी पारितोषिके पटकावली.
९ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्याम भूतकर, वामन तावडे, डॉ. अनिल बांदिवडेकर, जयंत पवार आणि कुंतला नरे यांनी काम पाहिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 8:44 pm