सांगली महानगरपालिका निवडणुकीत सत्ता गमवावी लागली असली तरी मतांची टक्केवारी म्हणजेच जनाधार वाढल्याचा कांगावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी करण्यात आला. तसेच काँग्रेसकडून पराभव स्वीकारावा लागल्यानेच बहुधा, काँग्रेस आणि शिवसेनेची जवळीक वाढल्याचा आरोपही केला.
सत्ता मिळाली नसली तरी गतवेळच्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. गेल्या वेळी राष्ट्रवादीने चिन्हाऐवजी महाआघाडीतून निवडणूक लढविली होती. तेव्हा ३८ जागा जिंकलेल्या आघाडीला ४० टक्के मते मिळाली होती. यंदा राष्ट्रवादीने १८ जागा जिंकल्या असल्या तरी ३० टक्के मते मिळाली आहेत. ४० जागा जिंकलेल्या काँग्रेसला ३८ टक्के मिळाली आहेत.
यावरून राष्ट्रवादीचा जनाधार वाढल्याचा निष्कर्ष जाधव यांनी काढला. एका निवडणुकीच्या निकालावरून राष्ट्रवादी संपली, असा अर्थ काढला जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांनी केलेली वक्तव्ये नडली का, या प्रश्नावर प्रचाराच्या काळात वादग्रस्त विधाने टाळली गेली पाहिजेत, अशी आपली भूमिका असल्याचे जाधव यांनी सांगितले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले तरी त्याचा लाभ विरोधकांना होत नाही याचा विरोधकांनी बोध घ्यावा, असे मतही त्यांनी मांडले. काँग्रेसने कुरापत काढल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्युत्तर द्यावे लागल्याचा दावाही करण्यात आला. काँग्रेस आणि शिवसेनेची जवळीक वाढली मग काँग्रेसबरोबर आघाडी कायम कशी ठेवणार यावर काही बोलण्याचे त्यांनी टाळले.
आघाडीबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी काहीही विधाने केली तरीही राष्ट्रवादी त्याला प्रत्युत्तर देणार नाही. कारण सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातील चर्चेनंतरच आघाडीचा निर्णय घेण्यात आल्याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले.

अजितदादा जहाल भाषणे करतात तेथे काँग्रेसला सत्ता – डॉ. कदम
पराभव झाला तरीही नाक वर करण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना सवयच जडल्याचे प्रत्युत्तर वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिले. सांगलीकर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या कारभाराला विटले होते. त्यांनी राष्ट्रवादीला योग्य धडा शिकविला. अजित पवार यांनी भोर तालुक्यात जहाल भाषण केले तेथे काँग्रेसला सत्ता मिळाली. सांगलीमध्येही तेच झाले याकडेही डॉ. कदम यांनी लक्ष वेधले.