मुंबईतील सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती अतिशय दयनीय असून गटारांमधील सांडपाणी वाहण्याची योग्य पद्धत नसल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये अधिक प्रमाणात सॅनिटरी नॅपकिनची योग्य प्रकारे विल्हेवाट लावत नसल्यामुळे गटारातील सांडपाणी वाहत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यावर तोडगा काढत शासनाने मानखुर्द आणि भांडूप येथील झोपडपट्टीमधील सार्वजनिक शौचालयात सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट यंत्र बसविण्यात आले आहे. या दोन यंत्राच्या साहाय्याने केवळ तीस मिनिटांमध्ये एका वेळी २० सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावली जाऊ शकते.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील ६ टक्के कचरा हा सॅनिटरी नॅपकिन आणि डायपरपासून तयार होतो. दर दिवसाला जमा होणाऱ्या ८५०० मेट्रिक टन कचऱ्यामधील सुमारे ५१० मेट्रिक टक कचरा सॅनिटरी नॅपकिनचा असल्याचे आढळले आहे. लहान वस्त्यांमध्ये महिला सुताचे कापड वापरण्याऐवजी बाजारातील सॅनिटरी नॅपकिनला प्राधान्य देतात. मात्र विल्हेवाट करण्याची योग्य पद्धत माहिती नसल्याने या महिला पॅड सार्वजनिक शौचालयात टाकून देतात. त्यामुळे गटारे तुंबली जात असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील वर्षी महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट यंत्र बसविण्याचा प्रस्ताव मांडला होता. या वर्षी हे यंत्र दोन शौचालयात बसविण्यात आले आहे. मानखुर्द येथील चिंचली मैयाका महिला मंडळ आणि भांडुपमधील कुंभ गगनगिरी महिला संस्था यांच्यावर यंत्राची जबाबदारी सोपवली असून या वेळी महिलांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, महानगरपालिकेच्या झोपडपट्टी स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतील अनेक वस्त्यांमध्ये अशा प्रकारे १०० यंत्र बसविण्याचा निविदा लवकरच काढण्यात येणार आहे.

महिलांना यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण
सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट यंत्र १३ मेपासून सार्वजनिक शौचालयात बसविण्यात आले असून जबाबदार व्यक्तीला यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या यंत्रातून ४५० सेल्सिअस कमान उष्णता प्लास्टिकच्या नॅपकिनना जाळते. यापुढे वस्तीतील महिला सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटासाठी या यंत्राचा वापर करतील. सध्या महिला हे यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण घेत आहेत, असे मानखुर्द येथील सुरेखा चंद्रकांत यांनी सांगितले.