News Flash

गोष्ट एका ‘पॅडवुमनची’

स्वाती बेडेकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे.

स्वाती बेडेकर

अत्रे कट्टय़ावर सॅनिटरी नॅपकीन निर्मात्या स्वाती बेडेकर यांची मुलाखत

‘पॅडमॅन’ चित्रपटात अक्षयकुमारची भूमिका प्रत्यक्षात जगणाऱ्या बडोद्याच्या स्वाती बेडेकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनानमित्त आचार्य अत्रे सांस्कृतिक कट्टय़ावर ७ मार्च रोजी सांयकाळी ६ वाजता जिजाऊ उद्यान येथे हा कार्यक्रम होणार आहे.

विज्ञान शिक्षणाचे काम करत असताना स्वाती बेडेकर यांना खेडोपाडी जायची वेळ येत असे. तेव्हा सहावी आणि सातवी इयत्तेत शिकणाऱ्या मुली अचानक शाळेतून नाहीशा होतात. शोध घेतला तर त्या वेळी त्या एक तर घराच्या मागच्या बाजूला एखादय़ा दगडावर संबंध दिवस बसून असत वा मातीचा अगर जुन्या घाणेरडय़ा लक्तरांचा वापर करत.

परिणामी ६८ टक्के मुली व स्त्रिया ‘व्हजायनल’ (गुप्तांगातील) आजाराने पीडित असल्याचे लक्षात आले. या प्रश्नाचे उत्तर शोधताना बचत गटांना हाताशी धरून ‘सखी’ या जैविक आणि सर्वाना परवडणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची त्यांनी निर्मिती केली. आज ‘सखी’चे ११ राज्यांत १०० गट यशस्वीपणे कार्यरत आहेत. येथील महिला कच्च्या मालाची पारख, यंत्राच्या साहाय्याने पॅड बनवणे, पॅकेजिंग, मार्केटिंग अशा सर्व गोष्टी स्वबळावर करीत आहेत. त्याचीच कथा त्या उलगडणार आहेत.

असे तयार होतात नॅपकीन!

केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केळीच्या बुंध्यापासून दोरे काढून आणले जातात. त्या दोऱ्यांपासून पॅड तयार केले जातात.(कारण त्यामध्ये शोषणाची शक्ती सर्वात जास्त असते). कच्च्या मालापासून पॅड बनवायला जे यंत्र लागते ते स्वाती यांचे पती शामसुंदर बेडेकर यांनी बनवले. एका महिलेला लागणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनच्या वर्षभराच्या कोटय़ाची किंमत फक्त ३०० रु. आहे.(महिन्याला १०प्रमाणे १२ महिन्यांच्या १२०पॅड ची किंमत). सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सध्या वापरतो त्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ब्रॅण्ड्सच्या पॅड्सचे विघटन ही पर्यावरणाच्या दृष्टीने जटिल समस्या ठरलीय. त्यामुळे या जैविक पॅड्सच्या विल्हेवाटीसाठीही बेडेकरांनी एक टेराकोटा मातीचे उपकरण बनवलेय. त्याला वीज लागत नाही की पाणी. पॅड कागदात गुंडाळून मशीनमध्ये जाळल्यावर जी चिमूटभर राख उरते तीही मातीत मिसळण्याच्या योग्यतेची असते. पॅड तयार करण्यापासून ते नष्ट करण्यापर्यंतची शास्त्रशुद्ध माहिती ठाण्यातील बचतगटांना मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अत्रे कट्टय़ाच्या अध्यक्षा शीला वागळे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 2:00 am

Web Title: sanitary napkin maker swati bedekar interview
Next Stories
1 ठाणे खाडीकिनारी चीन-जपानचा ‘राखाडी’ पाहुणा
2 पाणी मीटर खर्चातून ठाणेकरांची सुटका
3 बारवी धरणात जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
Just Now!
X