तंत्रमहोत्सवात ‘आयडिएट’ स्पर्धा; घरबसल्या शेती, स्वच्छता एक्स्प्रेस यासह विद्यार्थ्यांकडून अनेक कल्पना सादर

घरात बसून शेतावर नियंत्रण ठेवणे.. हरवलेल्याला शोधून काढणारे बूट.. रेल्वे रुळांवर तसेच डब्यात होणारा कचरा गोळा करण्यासाठी कल्पक पर्याय.. अशा एक ना अनेक भन्नाट कल्पना घेऊन देशभरातील विद्यार्थी आयआयटी मुंबईच्या संकुलात आले होते.

या विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योगाची जोड कशी देता येईल यासाठी आयआयटीमध्ये सुरू असलेल्या तंत्रमहोत्सवात ‘आयडिएट’ नावाची स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा ही स्पर्धा ‘टेकफेस्ट इनोव्हेशन चॅलेंज’ आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज(आयओटी) या दोन भागात विभागली गेली होती. त्यातही इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये कृषी आणि इतर आयओटी या दोन विभागांत घेण्यात आली होती.

‘साहसी’ बूट

महिला तसेच मुलांच्या संरक्षणासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न सुरू आहेतच. यालाच तंत्रज्ञानाची साथ लाभली आणि सुरक्षेचे अनेक पर्याय समोर आलेत. मात्र हे सर्व पर्याय मोबाइलमध्ये एकवटलेले आहेत. अनेकदा कठीण प्रसंगात मोबाइल वापरणे शक्य होत नाही. अशा वेळी त्यापेक्षा वेगळा पर्याय असणे गरजेचे असल्याचे औरंगाबाद येथील बारावी उत्तीर्ण साहस चितलांगे या विद्यार्थ्यांला वाटले आणि त्याने त्यावर काम करणयास सुरुवात केली.

तेव्हा त्याला आपल्या बूटामध्ये एक चीप बसविली तर ही समस्या सोडवली जाऊ शकते असे सुचले आणि त्याने तसे एक छोटे उपकरण तयार केले. या उपकरणामध्ये एक सिमकार्ड स्लॉट आहे व त्यात एक चीप देण्यात आली आहे. हे उपकरण चालावे यासाठी यात सात दिवस काम करेल अशी बॅटरीही देण्यात आली आहे. हे उपकरण आपण बूटाच्या आतील भागात इनरसोलच्या खाली ठेवू शकतो.

या उपकरणाच्या चीपमध्ये एक मोबाइल क्रमांक साठवलेला असतो. जेव्हा कधी आपण कठीण प्रसंगात आहोत असे वाटते तेव्हा केवळ पाय तिरका केला की या चीपमधील क्रमांकाला आपले लोकेशन कुठे आहे याचा संदेश जातो. जेणेकरून कुटुंबीयांना आपण संकटात आहोत हे समजते.

स्वच्छता एक्स्प्रेस

बाहेरगावच्या रेल्वेत प्रवास करताना अनेकदा घाणीचे साम्राज्य असते. डब्यात इतरत्र पडलेला कचरा इतकेच काय तर रेल्वे रुळांवर पडलेला कचरा अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. हा कचरा कसा नियंत्रणात आणायचा तसेच गाडय़ांच्या स्वच्छतागृहातून थेट रुळावर बाहेर पडणारा मैला कशा प्रकारे रोखायचा याबाबत विविध स्तरावर विचारमंथन झाले. पण आजही ही समस्या सोडविण्यात यश आलेले नाही. यामुळेच प्रवासाची आवड असलेल्या काही विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करणे अवघड वाटू लागले. यामुळेच अंधेरीतील चिल्ड्रन्स टेक्नॉलॉजी वर्कशॉपमधील अर्मान शेठ,  शिव मेहतायांच्यासह आठ शाळकरी विद्यार्थ्यांनी रेल्वेची स्वच्छता मोहीम हातात घेतली.

रेल्वे गाडीच्या प्रत्येक डब्याखाली ५१०० लिटरची कचराकुंडी लावावी. ही लावल्यानंतर प्रत्येक प्रवासी बसतो त्याच्या पायाखाली एक बटन द्यायचे. हे बटण दाबल्यावर थेट कचराकुंडीचे दार उघडेल व त्यात कचरा टाकता येईल. स्वच्छतागृहातील मैलाही अशाच प्रकारे साठवला जाऊ शकणार आहे. हा कचरा मुख्य स्थानकांवर रिकामा करून घेतल्यास कुंडी वापरासाठी पुन्हा उपयुक्त होऊ शकते. तसेच रेल्वेचा डबा स्वच्छ करण्यासाठी काही रोबोटिक्स उपकरणेही याच कुंडीतून वर येतील आणि डबा स्वच्छ करून जातील. या संल्पनेचे प्रारूप तयार असून विद्यार्थ्यांच्या या संकल्पनेला अनेक रेल्वे अधिकाऱ्यांनी लेखी अनुमोदन दिले आहे. यामुळे ही संकल्पना येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात येऊ शकेल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना वाटत आहे.

घरबसल्या शेती

यातील आयओटीच्या कृषी विभागात कर्जत येथील संकेत अभियांत्रिकी महाविद्यालयातील धनश्री म्हसे, नम्रता थोरवे, प्रियांका गोसावी, अक्षयी धुळे या विद्यार्थ्यांनी सुरज टाकेकर, संकेत टाकेकर, शिरिष पाटील, गायत्री सावंत या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ‘पॅट्रीयट’ नावाचा घरबसल्या शेतीवर लक्ष ठेवता येणारा प्रकल्प विकसित केला आहे. यामध्ये शहरातील एखादी व्यक्ती शेत विकत घेऊन त्याची राखण करण्यासाठी गावातील एखाद्या व्यक्तीला ठेवू शकतो. मात्र शेतात नेमके काय सुरू आहे याबाबतचा तपशील शहरातील माणसाला दिवसाच्या कोणत्याही वेळेला घेता येणे शक्य होणार आहे. यासाठी या विद्यार्थ्यांनी आयओटीचा वापर केला आहे. शेतातील बुजगावण्याच्या दोन्ही हातांवर एक चीप बसविण्यात आली आहे. यामध्ये सेल्फी मॉडय़ुल वापरण्यात आला आहे. यात झाडांसमोर कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्यातून झाड त्यांचे छायाचित्र टिपून ते समाजमाध्यमांवर शेअर करणार आहे. यामुळे झाडाला कोणता आजार झाला आहे याचा तपशील मिळणार आहे. या आजारावर उत्तर देण्याचा पर्यायही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे एखाद्या शहरी माणसाला घरबसल्या शेती करता येणे शक्य होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.