मुंबईतील माहिम परिसरात ‘अल्ताफ’ इमारत दुर्घटनेत वकिल रिझवान मर्चंट यांना आपल्या कुटुंबाला गमवावे लागले. रिझवान यांचा १२ वर्षांचा मुलगा फराज मर्चंट सोमवारी रात्री जेव्हा इमारत दुर्घटना झाली त्यावेळी आपल्या वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधत होता, परंतु इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकेल्या फराजचे सोमवारी मध्यरात्रीनंतर मोबाईलवर प्रतिसाद देणे बंद झाले. त्यावेळेस घटनास्थळी मदत कार्य सुरू होते आणि अखेर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास फराजचा मृतदेह सापडला. त्यानंतर काहीवेळाने वकिल रिझवान मर्चंट यांची पत्नी आसीफा आणि आई तेहेरा यांचेही मृतदेह सापडले. मनाला चटका लावणारी गोष्ट म्हणजे, मर्चंट यांनी त्यांच्या घरी दोन पोपटही पाळले होते. ते मात्र या दुर्देवी घटनेतून बचावले.     
वकिली क्षेत्रात कार्यरत असणारे रिझवान मर्चंट हे अभिनेता संजय दत्त याचे वकिल आहेत, संजय दत्तच्या बाजूने मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला रिझवान मर्चंट लढत आहेत.
गेल्या तीन दशकांपासून मर्चंट कुटुंब अल्ताफ इमारतीत वास्तव्याला होते. सोमवारी सकाळी मर्चंट कुटुंब विदेश सहलीवरून परतले होते. मर्चंट यांचा मोठा मुलगा फैज हासुद्धा वकिल आहे आणि मुलगी फिजा दक्षिण मुंबईतील एका कंपनीत कामाला आहे. रिझवान यांना सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास बाजूच्या इमारातीतील शेजाऱ्यांनी दुर्घटना झाल्याचे कळविले होते.