18 February 2019

News Flash

काँग्रेसमधील गटबाजीचे प्रभारींसमोर प्रदर्शन

मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात तक्रारी

संजय निरुपम (संग्रहित छायाचित्र)

मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात तक्रारी

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि राज्याचे नवनियुक्त प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य सहप्रभारी यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्याच्या वेळी मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे प्रदर्शन घडले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या एककल्ली कार्यपद्धतीवर काही आजी, माजी आमदारांनी प्रभारींकडे तकारी केल्या.  निरुपम यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणे अवघड असल्याचे सांगून मुंबईच्या नेतृत्व बदलाची मागणी त्यांनी केल्याचे समजते. मात्र अशा तक्रारी होतच राहतात, आपण सर्वाना बरोबर घेऊन काम करीत आहे, असा दावा निरुपम यांनी लोकसत्ताशी बोलताना केला.

काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपविली. त्यांच्या मदतीला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आशीष दुआ, सोनल पटेल आणि संपतकुमार यांची कुमक देण्यात आली आहे. नव्या नियुक्तीनंतर खरगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी व सोमवारी असा दोन दिवस मुंबईचा दौरा केला. पहिल्या दिवशी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण तसेच, अन्य वरिष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच दिवशी मुंबईतील आमदार नसिम खान, जनार्दन चांदोरकर, भाई जगताप, माजी आमदार कृपाशंकर सिंह व काही पदाधिकाऱ्यांनी खरगे यांची भेट घेतली आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रार केल्याचे समजते.

या संदर्भात नसिम खान यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी खरगे यांची काही आजी-माजी आमदारांनी भेट घेतल्याचे सांगितले. त्याचबरोबर मंगळवारी केंद्रीय सचिव आशीष दुवा, संपतकुमार व सोनल पटेल यांनी स्वंतत्रपणे मुंबईतील आजी-माजी आमदार, पदाधिकारी यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यात कृपाशंकर सिंह, बाबा सिद्दीकी, भाई जगताप, जनार्दन चांदूरकर आदींचा समावेश होता, असे त्यांनी सांगितले. निरुपम यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रभारींकडे तक्रार केल्याचे समजते, त्याबद्दल खान यांना विचारले असता, त्यांनी  भाष्य करण्याचे टाळले. परंतु एवढे लोक केंद्रीय सचिवांना भेटतात, मुंबई काँग्रेसच्या कामकाजाचा अहवाल मागवितात, म्हणजे पक्षात आलबेल नाही, असा त्याचा अर्थ होतो, अशी नाराजी अप्रत्यक्षरीत्या निरुपम यांच्या कारभाराबद्दल प्रभारींकडे व्यक्त केल्याचे त्यांनी सूचित केले.

अध्यक्ष कुणीही असो, त्याच्याविरोधात तक्रारी होतच असतात आणि ते केवळ मुंबईत नव्हे तर, अन्य राज्यांमध्येही अशा तक्रारी सुरू असतात. कुणाच्या काही तक्रारी असल्या तरी, आपण सर्वाना बरोबर घेऊन काम करीत आहे.   – संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष

First Published on July 12, 2018 1:50 am

Web Title: sanjay nirupam 2