सहकारमंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल या संस्थेने बनावट कागदपत्रे सादर करुन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत निरुपम यांनी देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. राज्य सरकारकडून राष्ट्रीय विकास कार्यक्रमाअंतर्गत कृषी संस्थांना अनुदान दिले जाते. याचा फायदा घेत देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट सहकारी संस्थेला २४.८१ कोटींचे अनुदान मंजूर झाले. त्यातील पाच कोटी त्यांच्या संस्थेला मिळाले. तसेच दुध भुकटी बनवण्यासाठी बंद पडलेल्या व अस्तित्वात नसलेल्या संस्थांची नावे दिले. अनुदान मिळवण्यासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे माहिती अधिकारात उघड झाल्याचा दावा करत निरुपम यांनी देशमुख यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्अी करावी अशी मागणी केली.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाला बनावट संमतीपत्र सादर केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा खोटा स्टॅम्प असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला.

यापूर्वी देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल्याचा आरोप आहे. तसेच महानगरपालिकेच्या राखीव जागेवर बंगला उभारल्याच्या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. सुभाष देशमुख यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आले आहेत.