निविदेतील अटींचे उल्लंघन केल्याचा संजय निरुपम यांचा आरोप

पाच वर्षांचा पूर्वानुभव या निविदेतील अटीचे उल्लंघन करीत वाहने उचलण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या नागपूरच्या ‘विदर्भ इन्फोटेक’ या कंपनीला मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहने उचलण्याचे काम दिल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. हे काम मिळाल्यावर कंपनीने वाहने उचलण्याचे काम करतो, अशी नोंदणी केल्याची कागदपत्रेच त्यांनी सादर केली.

मुंबईत वाहने उचलण्याच्या (टोइंग) कामात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. मुख्यमंत्री नागपूरचे, हे काम मंजूर करणारे अधिकारी नागपूरचे आणि कंपनीही नागपूरची. नागपूरच्या या मंडळींनी एकत्र येऊन मुंबईकर वाहनचालकांची लूट चालविल्याचा आरोप निरुपम यांनी केला.

गेल्या वर्षी वाहने उचलण्याची निविदा मागविण्यात आली असता त्यात पाच वर्षांचा अनुभव ही अट टाकण्यात आली होती. २७ मे २०१६ रोजी वाहने उचलण्याच्या कामाचा कोणताही अनुभव नसलेल्या विदर्भ इन्फोटेक कंपनीला हे काम देण्यात आले. त्यासाठी दंडाची रक्कम १५० रुपयांवरून ६६० रुपये करण्यात आली. हे सारे ठेकेदाराच्या फायद्यासाठीच करण्यात आल्याचा आरोपही निरुपम यांनी केला.

हे काम मिळाल्यावर ‘विदर्भ इन्फोटेक’ या कंपनीच्या भागधारकांच्या २२ जुलै २०१६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनी करीत असलेल्या कामांमध्ये वाहने उचलणे याचा समावेश करण्यात आला. तशी नोंदणी कंपनी विभागात (रजिस्टेशन ऑफ कंपनी) करण्यात आली. याची सारी कागदपत्रेच निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. या कंपनीकडे कोणताही अनुभव नसताना कंपनीने अटींची पूर्तता केली, असा शेरा फाइलवर कसा काय मारण्यात आला, असा सवालही निरुपम यांनी केला. कंपनीला सात वर्षांसाठी काम देण्यात आले असून, दरवर्षी दंडाच्या रक्कमेत १० टक्के वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ‘विदर्भ इन्फोटेक’ कंपनीला अटींचे उल्लंघन करीत काम देण्यात आल्याने वाहने उचलणाऱ्या संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. राज्य सरकारच्या वतीने गेले वर्षभर कोणतीही माहितीच न्यायालयात सादर केली जात नसल्याचा आरोपही निरुपम यांनी केला.

दराडे यांना अभय कशासाठी ?

वाहने उचलण्याच्या कामात झालेल्या घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन सचिव आणि मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे सहआयुक्त प्रवीण दराडे यांच्यावर आरोप केल्यावर त्यांची बाजू घेणारे प्रसिद्धीपत्रक मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केल्याबद्दल निरुपम यांनी शंका व्यक्त केली आहे. दराडे यांच्यावर आरोप झाल्यावर कोणत्याही चौकशीविना त्यांना अभय कसे काय देण्यात आले, असा सवालही निरुपम यांनी केला.