संजय निरुपम यांची मागणी

अग्निशमन दलाने ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र दिले नसतानाही आग लागलेल्या इमारतींमध्ये लोक राहायला कसे गेले, असा प्रश्न उपस्थित करीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आगप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.

मुंबईत गेल्या १२ दिवसांमध्ये किमान १२ ठिकाणी आग लागली. त्यांत २० जणांचा मृत्यू झाला. बहुतांश दुर्घटनाग्रस्त इमारतींना अग्निशमन दलाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळाले नव्हते. काही इमारतींना निवासी दाखलाही मिळाला नव्हता, असे असताना लोक राहायला कसे गेले, असा प्रश्न निरुपम यांनी विचारला.

पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अखत्यारीत अग्निशमन दल आहे. त्यामुळे या दुर्घटनांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. म्हणून या प्रकरणांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली.

कांदिवलीच्या दामुनगरमधील एका कारखान्याला २३ डिसेंबरला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांनी चेंबूरमधील ‘सरगम’ सोसायटीमध्ये आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला.