रिलायन्स एनर्जी कंपनीने मुंबईतील वीज दर कमी केले नाहीत, तर या कंपनीचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या घराबाहेर आपण आत्मदहन करु, असा इशारा शनिवारी काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी दिला. वीजदर कपातीसाठी निरुपम यांनी कांदिवली येथील रिलायन्सच्या कार्यालयाबाहेर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने गेल्याच आठवडय़ात राज्यात उद्योगांसह सर्व सामान्य वीज ग्राहकांच्या वीज दरात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. मुंबई वगळून राज्यात सर्वत्र लागू हा निर्णय लागू होणार आहे. निवडणुकांच्या तोंडावरच संजय निरुपम, प्रिया दत्त व केंद्रात राज्यमंत्री असलेले मिलंद देवरा या मुंबईतील तीन काँग्रेसच्या खासदारांनी महानगरातील वीज दर कपात करावी अशी मागणी केली आहे.
संजय निरुपम यांनी तर ही मागणी धसास लावण्यासाठी रिलायन्सच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आपली मागणी मान्य झाली नाही, तर रिलायन्स एनर्जी कंपनीचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या घराबाहेरच आत्मदहन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या सर्वच कंपन्यांचे लेखापरिक्षण करावे, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, वीजदर निश्चिती हा राज्य वीज नियामक आयोगाच्या अखत्यारीतील विषय असून या मुद्दय़ावर राजकारण सुरू होणे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया रिलायन्सने व्यक्त केली आहे. मुंबईत रिलायन्सबरोबरच टाटा आणि बेस्ट हेदेखील वीज पुरवठादार असताना, केवळ रिलायन्सच्या विरोधात आंदोलन करणे अनाकलनीय असून वीजदरासंदर्भातील आमचे म्हणणे आम्ही याआधीच राज्य सरकार व वीज नियामक आयोगाला सादर केले असल्याचेही रिलायन्सने स्पष्ट केले आहे.