सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेससाठी संवेदनशील असणाऱ्या मुद्दय़ांवर टीकाटिप्पणी किंवा मतप्रदर्शन करीत खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला सातत्याने अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राऊत यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगण्याची वेळ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर शनिवारी आली.

कुख्यात करिमलाला यांची भेट घेण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या मुंबईत येत असत, असे विधान अलीकडेच केल्याने काँग्रेसने तीव्र नापसंती व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यावर शिवसेना नेतृत्वाला हस्तक्षेप करावा लागला होता. यानंतर राऊत यांना आपले विधान मागे घ्यावे लागले. हा वाद संपुष्टात येताच राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न पुरस्कारावरून पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध दर्शविला. यावर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानमधील सावरकर यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीत दोन दिवस ठेवावे म्हणजे त्यांना कळेल, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

सावरकर यांच्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीकाटिप्पणी केल्यापासून काँग्रेस नेते सावरकरांच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना उद्देशून राऊत यांनी मतप्रदर्शन केल्याने काँग्रेसमध्ये त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली. राऊत यांचे विधान म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

‘अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा शेकडो लोकांनी भोगली आहे. विशेष म्हणजे माफी न मागता शिक्षा भोगलेल्यांचे बलिदान लक्षात घेता साऱ्यांनाच भारतरत्न द्यावा लागेल, असे मत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. आघाडीच्या समान किमान कार्यक्रमात सावरकर हा विषय नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आदित्य यांची सावध प्रतिक्रिया..

संजय राऊत यांच्या विधानाने पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्याच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. सावरकरांबद्दल राऊत यांचे हे वैयक्तिक मत असून, इतिहासावर किती दिवस बोलणार, असा टोलाही राऊत यांना लगावला. यावर सावरकर हा विचार केवळ इतिहास नसतो तर तो वर्तमान आणि भविष्यकाळ असतो, असे आदित्य यांना प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे सावरकरांवरील विधान खासदार राऊत यांनी मागे घेऊ नये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशीष शेलार यांनी व्यक्त केली.

पक्षाचे नियंत्रण नाही? : राऊत यांच्यामुळे सातत्याने अडचण होत असताना शिवसेनेच्या नेतृत्वाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आघाडीचे सरकार स्थापन होण्यात महत्त्वाची भूमिका बजावूनही भावाला मंत्रिपद न दिल्याने राऊत नाराज होते. त्यातच दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या भेटीला आदित्य गेले असता राऊत यांना अंधारात ठेवण्यात आले. दिल्लीतील शिवसेनेबद्दलची अनुकूल भूमिका प्रियंका चतुर्वेदी मांडू लागल्याने राऊत यांचे महत्त्व कमी होत गेले.