तेराव्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली. राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेचं संजय राऊत यांनी स्वागत करत राज्यातील अस्थिरता संपावी हीच आमची भूमिका असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस आणि आमचे विचार वेगळे असले म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. आमचे राजकीय राजकीय मतभेद आहेत. ते कोणाचे नसतात. आम्ही अनेकदा भाजपाच्या विरोधातही मुद्दे मांडले. त्यामुळे ते आमचे शत्रू आहेत असं नाही अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याच्या भल्यासाठी प्रत्येकांनी प्रत्यन्त केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे चांगले नेते होते आणि आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

भाजपानं निकालानंतर २४ तासांत जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा होता. पण भाजपाने सत्ता स्थापन करायला ऐवढा वेळ का लावला माहित नाही. भाजपनं सत्तास्थापनेच्या संधीचा लाभ घ्यायला हवा. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला आमच्याकडून शुभेच्छा, असे उद्गार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा उद्धव ठाकरे यांच्याइतका चाणाक्ष नेता राज्यात नाही. असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, विधानसभेतील सदस्यसंख्येचा आढावा घेतल्यास भाजप १०५ आणि शिवसेना ५६ असे १६१ संख्याबळ होते; पण उभयतांमध्ये सध्या तरी बिनसले. दुसरा पर्याय हा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असा असू शकतो. या तिघांचे संख्याबळ १५४ होते; पण काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर जाण्यास तयार नाही. काँग्रेसने पाठिंबा देण्यास नकार दिल्यास शिवसेना व राष्ट्रवादीचे संख्याबळ होत नाही. तिसरा पर्याय हा भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा. तसे झाल्यास १५९ संख्याबळ होते. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊ केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-राष्ट्रवादीत चर्चा सुरू असल्याचा उल्लेखही पत्रकार परिषदेत केला होता.