“आज पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील ३० दिवसांपासून थंडी-वाऱ्यामध्ये बसलेला आहे. त्यांना देशद्रोही ठरवण्याचं काम तरी आतापर्यंत इतर कुठल्या राजकीय पक्षाने केल्याचं मला दिसत नाही, ते भाजपा करतोय.” असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजपावर टीका केली.

शेतकरी आंदोलन व पंतप्रधान मोदी यांनी आज देशभरातील शेतकऱ्यांशी साधलेल्या ऑनलाईन संवादाच्या पार्श्वभूमीवर आज माध्यामांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “मागील पाच वर्षांमध्येच शेतकऱ्यांचा फायदा झाला, असं जर ते म्हणत असतील. तर त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या अगोदर दहा वर्षे शरद पवार कृषी मंत्री होते. काही काळ राजनाथ सिंह कृषी मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. मोरारजी देसाई पंतप्रधान होते. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते. हा कृषी प्रधान देश आहे असा जो काही मागील ७० वर्षांपासून आपण डंका पिटतोय त्याचं श्रेय नक्की मग कोणाला द्यायचं?”

तसेच, “मी असं म्हणत नाही की शेतकऱ्यांची सध्याची जी स्थिती आहे. ती खूप हालाकीची आहे आणि त्याला जबाबदार फक्त एकच राजकीय पक्ष आहे. या देशाचा विकास व शेतकऱ्यांसबंधी भूमिका वेळोवेळी ज्या घेतल्या गेल्या आहेत, त्या नेहमी राष्ट्र हिताच्याच राहिल्या आहेत आणि प्रत्येक सरकारने कधीही शेतकऱ्यांसाठी वेगळी भूमिका घेतल्याचं मला दिसत नाही.पंडीत नेहरु, इंदिरा गांधी ज्यांच्या नावानं आपण किसान दिन साजरा करतो ते चरणसिंग देखील काही काळ या देशाचे पंतप्रधान होते. हा किसान दिवस देखील मोदी सरकारने चांगल्या प्रकारे साजरा केला. या संदर्भात जरा सध्याच्या राज्यकर्त्यांनी माहिती घेतली पाहिजे.” असा टोला देखील संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.

देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी लक्षात आहे हे कौतुकास्पद-संजय राऊत

“आज मी पंतप्रधानांचं भाषण ऐकत होतो. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या आजच्या जन्मदिवशी शेतकऱ्यांना मदत होईल अशा काही घोषणा केल्या आहेत, त्याचं मी स्वागत करतो. या देशातील शेतकऱ्यास प्रत्येक सरकारने आधार द्यायचा प्रयत्न केला आहे. पण निसर्गाने साथ दिली नाही. जागतिक धोरणं, शेतकऱ्यां संदर्भातील नियम, शेतीचं होत असलेलं व्यापारीकरण यामध्ये अनेकदा शेतकऱ्यांचं नुकसान झालं.” असं देखील संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.