मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोनापासून राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दणक्यात बोलले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामनासाठी घेतली आहे. सगळ्याच प्रश्नांना दिलखुलास उत्तरं मिळाली आहे. ही मुलाखत २५ आणि २६ जुलै अशी दोन भागांमध्ये पाहता येणार आहे अशी फेसबुक पोस्ट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मागील आठवड्यातच संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये शरद पवार यांनी करोना प्रश्न, महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग, चीनचा पश्न आदी विषयांवर सविस्तर भाष्य केलं होतं. एकच शरद सगळे गारद असं या मुलाखतीचं मुख्य शीर्षक होतं. ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आली. त्याचप्रमाणे आता संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत. उद्धव ठाकरेंची दिलकी बात राजकारण ढवळून गाढेल असं त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. करोनापासून राम मंदिरापर्यंत सगळ्याच प्रश्नांवर मुख्यमंत्री बोलले आहेत असं संजय राऊत यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

करोनाची राज्यातली स्थिती आणि लॉकडाउन यामुळे विरोधकांनी उद्धव ठाकरे सरकारवर चांगलीच टीका केली आहे. तसंच स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असेल किंवा निसर्ग वादळाचा प्रश्न असेल त्या सगळ्यावरुनही भाजपाने मुख्यमंत्र्यांवर वेळोवेळी टीका केली आहे. या सगळ्या आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच महाविकास आघाडीच्या सरकारच्या प्रयोगाबाबत ते काय भाष्य करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.