|| उमाकांत देशपांडे

राममंदिराच्या मुद्दय़ावर श्रेयासाठी राजकीय कलगीतुरा

अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मुद्यावर हिंदुत्ववादी पक्षांमध्येच राजकीय शिमगा सुरू झाला असून शिवसेना विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप विरुद्ध शिवसेना असा तिरंगी सामना रंगला आहे. शिवसेनेच्या २५ नोव्हेंबरच्या अयोध्या मुहूर्तावरच जनाग्रह  मेळावा आयोजित करण्याच्या रा. स्व. संघाच्या कृतीला शिवसेनेने षडयंत्राची उपमा देऊन बाबरी मशीद पाडली तेव्हा ‘हे’ कुठे होते, असे विचारले आहे. तर दुसरीकडे विहिंपने शिवसेनेला ‘आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारा, मग अयोध्येत लक्ष घाला’, असा टोला लगावला आहे.

भाजपने आतापर्यंत हिंदुत्वाचे राजकारणच केले, असा हल्ला चढवीत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिवसेनेच्याच २५ नोव्हेंबर या मुहूर्तावर जनाग्रह  मेळावा आयोजित करण्यामागे षड्यंत्र असल्याचा आरोप केला. हे षड्यंत्र कोणी व कशासाठी रचले आहे, असा संतप्त सवाल करीत ‘कोणीही त्या दिवशी अयोध्येत यावे, शिवसेनेला त्याची पर्वा नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा ‘हे’ कुठे होते, अशी विचारणाही राऊत यांनी केली.

दुसऱ्या बाजुला शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेवर विश्व हिंदू परिषदनेही हल्ला चढविला आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारावे आणि मग अयोध्येकडे लक्ष द्यावे, असे टीकास्त्र परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्या. विष्णू कोकजे यांनी सोडले. ते रविवारी मुंबईत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला ‘चलो अयोध्या’ मोहिमेची घोषणा केल्यावर भाजपला धक्का बसला असून संघानेही हाच मुहूर्त निवडत अयोध्या, बंगळुरू, नागपूर इत्यादी ठिकाणी अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘जनाग्रह रॅली’ काढण्याचे जाहीर केले आहे. या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना राऊत म्हणाले, ‘शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरच्या मोहिमेची घोषणा केली होती. शिवसेनेला शक्तीप्रदर्शन करायचे नाही, पण संघाने हाच दिवस निवडण्यामागे नेमके कोणते षड्यंत्र आहे? ही आडकाठी कशासाठी?’

विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्या. विष्णू कोकजे यांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या अयोध्या मोहिमेला शक्तीप्रदर्शन म्हटले आहे. एवढय़ावरच कोकजे थांबलेले नाहीत, तर ‘महाराष्ट्रात परप्रांतीयांच्या मुद्दय़ावरून ते उत्तरभारतीयांना झोडतात, त्यामुळे तेथे जाऊन ते कोणते आवाहन करणार आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे.शिवाय, शिवसेनेला इतक्या वर्षांनी राम मंदिराचा मुद्दा कसा आठवला? त्यांची तेथे ताकद किती, असा शालजोडीतले प्रश्नही कोकजे यांनी विचारले आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने कायदा करावा, न्यायालयाच्या निकालाची किती काळ प्रतीक्षा करणार? त्याऐवजी अध्यादेश जारी करावा, अशी मागणीही त्यांनी केली. शबरीमला मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशाच्या मुद्दय़ावरून सुरू असलेल्या वादाबाबतही त्यांनी मत व्यक्त केले. ज्या महिला पत्रकार व कार्यकर्त्यां तेथे जात आहेत, त्यांना इतके दिवस हे मंदिर कुठे होते, ते माहीतही नव्हते, अशी टिप्पणी कोकजे यांनी केली.

शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेमुळे अन्य हिंदुत्ववादी संघटनाही श्रेयासाठी आक्रमक झाल्याचे शिवसेना आणि विहिंप नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. राममंदिर उभारण्यासाठी सरकारने कायदा केला किंवा त्याही पुढे जाऊन मंदिर उभे राहिले तर त्याचे श्रेय शिवसेना घेणार हे स्पष्ट दिसू लागल्याने शिवसेनेच्याच मुहूर्तावर ‘जनाग्रह रॅली’ काढून उद्धव यांच्या मोहिमेतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न भाजपच्या सूचनेवरून संघाने सुरू केल्याची चर्चा आहे.

बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडली गेली. कारसेवकांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या कृतीची जबाबदारी घेण्याची तयारी त्यावेळी कोणीही दाखविली नव्हती. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांनी ही मशीद पाडली असेल, तर त्यांचा मला अभिमान आहे, असे जाहीर केले होते. या पाश्र्वभूमीवर, ‘मशीद पाडली गेली, तेव्हा हे कुठे होते? असा सवाल राऊत यांनी केला आहे. शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेला शह देण्यासाठी भाजपने संघाच्या माध्यमातून केलेल्या राजकीय खेळीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही तयारी सुरू केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांना एकत्र आणून मंदिराचा शिलान्यास करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जाण्याची आणि त्यासाठी दबाव वाढवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संघाच्या जनाग्रह मेळाव्यामागे षड्यंत्र – शिवसेना

शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेचाच दिवस संघाने जनाग्रह मेळाव्यासाठी निवडण्यामागे नेमके कोणते षड्यंत्र आहे? हे षड्यंत्र कोणी, कशासाठी रचले आहे? कोणीही त्या दिवशी अयोध्येत यावे, शिवसेनेला त्याची पर्वा नाही. आमच्या निर्णयात बदल होणार नाही. पण बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा ‘हे’ कुठे होते? शिवसेनेला शक्तीप्रदर्शन करायचे नाही.    – संजय राऊत, प्रवक्ते, शिवसेना

आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारा – विहिंप

शिवसेनेला अयोध्येत शक्तीप्रदर्शन करायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारावे, मग अयोध्येकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्रात ते उत्तरभारतीयांना झोडतात, त्यामुळे तेथे जाऊन ते काय करणार? त्यांची तेथे ताकद किती?इतक्या वर्षांनी राम मंदिराचा मुद्दा कसा आठवला?    – विष्णू कोकजे, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विहिंप.