सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. मात्र, देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद संपताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांवर परखड शब्दांमध्ये पलटवार केला आहे. “कुणाच्या राज्यात कोण वसुली करत होतं आणि त्यांचे वसुली इनचार्ज कोण होते, यासंदर्भात किमान राजकारणातल्या लोकांनी तरी बोलू नये. हमाम में सब नंगे होते है”, असं राऊत म्हणाले आहेत. तसेच, परमबीर सिंग यांची बदली हा मुद्दाच नाहीये, असं देखील ते म्हणाले.

काय म्हणाले होते फडणवीस?

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “सचिन वाझे हे काहींसाठी वसुली एजंटचं काम करत होते, त्यांचे खरे ऑपरेटर्स कोण आहेत, हे शोधून काढलं पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

हा तर मुद्दाच नाही!

दरम्यान, परमबीर सिंग यांची बदली हा मुद्दाच नाहीये, असं राऊत म्हणाले. “ज्या प्रकारचं वातावरण बनलं होतं, त्यावर मुख्यमंत्र्यांना वाटलं की ज्या अधिकाऱ्याबाबत शंका आहे, त्याचा तपास होईपर्यंत बदली व्हायला हवी. विरोधकांना वाटतंय हा खूप मोठा मुद्दा आहे. पण हा मुद्दाच नाहीये. जर विरोधकांना याचा मुद्दा बनवायचा असेल, तर तो त्यांनी पुढची साडेतीन वर्ष तो बनवत राहावा. सरकारचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही. जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी समोर येतात, तेव्हा कारवाई करणं हे आमचं कर्तव्य आहे”, असं ते म्हणाले.

“सचिन वाझे, परमबीर सिंग ही तर प्यादी, खरे सूत्रधार सरकारमध्येच”, फडणवीसांचा थेट सरकारवर निशाणा!

…तर चर्चा लांबपर्यंत जाईल!

यावेळी राऊतांनी भाजपावरच पलटवार केला. “या देशात अशा अनेक घटना याआधीही घडल्या आहेत आणि कारवाया देखील झाल्या आहेत. जर चर्चाच करायची, तर लांबपर्यंत चर्चा जाईल. पण आमचं कर्तव्य आम्ही जाणतो. आणि त्याच कर्तव्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना सत्यापासून फारकत घेत होते. मुंबईत जे घडलं, त्यावर विधिमंडळात त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत. पण त्यामुळे तपासाचे सूत्रधार तेच आहेत, असं मानणं चूक आहे. तपास एनआयए आणि एटीएस करत आहे. तपास समोर आल्यानंतर त्यावर बोलू. भाजपाच्या कार्यकाळात यापेक्षा भयंकर घटना घडल्या आहेत. आम्ही त्यात कधीच हस्तक्षेप केलेला नाही. तपास करणं तिथल्या पोलिसांचा अधिकार असतो. केंद्रीय यंत्रणा तिथे कधी घुसल्या नाहीत”, असं ते म्हणाले.

कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे?