सचिन वाझे प्रकरणावरून राज्यात निर्माण झालेलं राजकीय वादळ शमण्याची कोणतीही चिन्ह दिसून येत नाहीयेत. या मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे. त्यासोबतच आता नारायण राणेंनी देखील आपल्या शैलीमध्ये राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, आपल्या टिकेसाठी त्यांनी संजय राऊत यांच्याच रोखठोक लेखाचा आधार घेतला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्याच खांद्यावर बंदूक ठेऊन विरोधक राज्य सरकारवर निशाणा साधत असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. “मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेबद्दल असं काय प्रेम आहे? मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेंच्या पार्श्वभूमीची माहिती कशी नाही? सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?”, असे परखड सवाल नारायण राणेंनी विचारले आहेत.

काय आहे ‘रोखठोक’ लेखामध्ये?

सचिन वाझे प्रकरणापासून टीकेच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोक स्तंभातून मोठा गौप्यस्फोट केला होता. “अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा शरद पवारांनी हे पद अनिल देशमुखांकडे दिले”, असं या लेखात म्हटलं आहे. तसेच, “सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?” असा सवाल देखील राऊतांनी केला आहे. त्यावरूनच आता राणेंनी सरकारवर टीका केली आहे.

“राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो..”, संजय राऊतांची फडणवीसांवर बोचरी टीका!

“राऊतांचा लेख म्हणजे लेकी बोले, सुने लागे”

“राज्यात गेल्या सव्वा वर्षापासून राजकीय धुळवड सुरू आहे. सामनाच्या लेखातून संजय राऊतांनी पहिल्यांदाच सरकारच्या चुका दाखवून दिल्या आहेत. सचिन वाझेला वाढवलं, त्याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागत आहेत. संजय राऊतांचा लेख म्हणजे लेकी बोले, सुने लागे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चुका नाव न घेता दाखवून दिल्या आहेत”, असं राणे म्हणाले आहेत. “परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या का? सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या केल्यानंतर देखील त्याला अटक करू देत नव्हते. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याबद्दल असं काय प्रेम आहे? मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेच्या बॅकग्राऊंडचीही माहिती कशी नाही? सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?” असं राणे म्हणाले आहेत.

“मुख्यमंत्री फोन टॅपिंगवर का बोलत नाहीत?”

“फोन टॅपिंग बेकायदेशीर आहे वगैरे हा नंतरचा भाग आहे. पण त्या फोन टॅपिंगमध्ये काय आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यात अधिकाऱ्यांची नावं आली आहेत. नेत्यांची नावं आहेत. ते आधी बाहेर काढलं पाहिजे. टॅपिंग कायदेशीर होतं की बेकायदेशीर होतं हा मुद्दा नंतरचा आहे. पैसे मागितल्याचं टेप झालं आहे. पण आपल्यावर आरोप होऊ नये, म्हणून रश्मी शुक्लांवर आरोप करणं सुरू आहे. ही कायद्याची चेष्टा सुरू आहे का? का मुख्यमंत्री यावर काही बोलत नाही?”, असा थेट सवाल नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.

संजय राऊत म्हणतात, “सचिन वाझेंना परत सेवेत घेतलं, तेव्हाच म्हणालो होतो..अडचण होईल!”