मुंबई : करोनाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्राने के लेल्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. आरोप करणे त्यांचे काम असून राज्य सरकारचे कार्य चांगले नसल्याचा त्यांनी आरोप केला होता. पण करोना काळात महाराष्ट्राने चांगले काम केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लक्ष वेधले.

करोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता करोनाविरोधातील लढय़ात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीनेही फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. इतर राज्यांत ही स्थिती दिसत नाही. इतर राज्यात पाहिले तर स्मशानभूमीसमोर प्रेतांच्या रांगा दिसत आहेत,  असेही राऊत यांनी नमूद केले.

तर देवेंद्रजी तुम्ही राज्य सरकारवर टीका करणारे पत्र लिहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक के ले. आता प्रश्न एवढाच आहे की तुम्ही बरोबर आहात की पंतप्रधान मोदी असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी के ला आहे. तर मुंबई आणि महाराष्ट्रातील कोविडची स्थिती वाईट असताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल कौतुक केले असेल असे मला वाटत नाही.  परंतु, तशा प्रकारे जाहीर करण्याचा मुख्यमंत्री कार्यालयाचा प्रयत्न हास्यास्पद वाटतो, अशी टीका  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी के ली आहे.