भारत-पाकिस्तान प्रसारमाध्यमे तसेच राजकीय नेत्यांनाही खबर न लागू देता आज अचानक पंतप्रधान नरेद्र मोदी पाकिस्तानला पोहचले आहेत. त्यांनी पाकिस्तानला अचानक दिलेल्या भेटीमुळे विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेने मोदींच्या पाकिस्तान भेटीवर टोलेबाजी केली आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदी अफगणिस्तानवरून थेट पाकिस्तानला गेले आहेत. आपले पंतप्रधान पाकिस्तानला गेले ही खूपच मोठी गोष्ट आहे. ते मित्रपक्षांशी अशा गोष्टींबद्दल बोलत नाहीत, त्यांचा सल्ला घेत नाहीत ही वेगळी गोष्ट आहे. आज नवाझ शरीफ यांचा तर उदया दाऊद इब्राहिमचा वाढदिवस आहे. मोदी-शरीफ भेटीनंतर पाकिस्तान दाऊदला भारताच्या ताब्यात देणार असतील तर मोदींच्या दौ-याच स्वागत करायल हरकत नाही.
पाकिस्तानबद्दलची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. जो पर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही, तो पर्यंत त्यांच्याशी कुठलीही चर्चा करु नये असे राऊत म्हणाले. कालच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात १२-१३जण जखमी झाल्याची आठवणही यावेळी राऊत यांनी करुन दिली.