वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात आली होतीच. गेल्या वर्षभरापासून ही अर्थव्यवस्था ढासळली आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट आहे. त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुकही केलं आहे. अनुच्छेद ३७० रद्द केल्याबद्दल आम्ही सरकारचं कौतुकही केलं आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

सध्याच्या घडीला भारत पाकिस्तान, काश्मीर प्रश्न, भारत चीन प्रश्न मागे सोडून करोनाच्या संकटाचा सामना करण्याची गरज आहे. राजकारण आजच्या घडीला सगळ्यांनीच बाजूला ठेवलं पाहिजे. पुढील दोन वर्षे तरी आपल्याला राजकारण करणं सोडावं लागेल. राजकारण करण्यासाठी बराच काळ आहे. तूर्तास करोनाच्या संकटाशी लढलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- केंद्राकडून सहकार्य मिळालं नाही असं म्हटलंच नाही : संजय राऊत

सध्याचा काळ राजकारण करण्याचा काळ नाही तर करोनाच्या संकटाला सामोरं जाण्याचा काळ आहे. येत्या काळातही आम्हा सगळ्यांनाच राजकारण विसरून पुढे महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसंच राहुल गांधी यांनी जे म्हटलं होतं की आम्ही महाराष्ट्रात सत्तेत होतो मात्र आम्हाला अधिकार नाहीत त्याचं काय? त्यावर संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार असलं तरीही सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी योग्यच सांगितलं. मात्र आमचं सरकार पाच वर्षे टिकणार आहे याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.