उच्च न्यायालयाचे दहीहंडी उत्सवाबाबत दिलेले आदेश आणि दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देत राज्य सरकारने जाहीर केलेले धोरण यामध्ये विसंगती असल्याने ठाण्यातील ‘संघर्ष प्रतिष्ठान’पाठोपाठ मुंबईतील संकल्प प्रतिष्ठाननेही उत्सवाच्या आयोजनातून माघार घेतली आहे. त्यामुळे गिरगाव, ग्रॅन्ट रोड, वरळी, लालबाग, खेरवाडी परिसरातील तमाम आयोजकांनी यंदा दहीहंडीचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
उच्च न्यायालयाने दहीहंडीसाठी रचण्यात येणाऱ्या थरात १२ वर्षांखालील मुलाच्या सहभागाला मनाई केली आहे. त्याचबरोबर दहीहंडीच्या उंचीलाही २० फुटांची मर्यादा घातली आहे. सरकारने  अटी आणि नियमांची माहिती अद्यापही जाहीर केलेली नाही.
न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करायचे की राज्य सरकारच्या धोरणानुसार दहीहंडी उत्सव साजरा करायचा असा संभ्रम आयोजकांच्या मनात निर्माण झाला आहे. उत्सवाच्या धोरणात सुस्पष्टता नसल्याने संस्कृती प्रतिष्ठानतर्फे वरळीच्या जांबोरी मैदानात यंदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही, असे ‘संकल्प’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.