सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली खंत
* एसआयईएसचे नॅशनल एमिनन्स पुरस्कार प्रदान
* अमिताभ बच्चन, स्वामी तेजोमयानंद, सॅम पित्रोदा हेही यंदाच्या पुरस्काराचे मानकरी
संस्कृत भाषेत वैज्ञानिकता आहे. संगणकाची भाषा ठरविताना संस्कृतचा विचार केला गेला. ‘वसुधैव कुटूंबकम’ ही संकल्पना संस्कृतमधून मांडली गेली आहे. कुटुंबामध्ये प्रेम असावे हा विचार संस्कृतमधून मांडला आहे. परंतु, इंग्रजीमध्ये ‘मार्केट’ ही संकल्पना मांडली असून ‘बाजार’ म्हटले की तिथे प्रेम नव्हे तर फक्त व्यापार असतो. प्राचीन संस्कृत साहित्यातले आणि पौराणिक दाखले देत संस्कृती ही सर्वसामान्यांची भाषा होती. परंतु, आता ती केवळ कर्मकांडापुरती राहिली आहे, अशी खंत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली.  
साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पंधराव्या श्री चंद्रशेखरंद्र सरस्वती नॅशनल एमिनन्स पुरस्कारांचा वितरण सोहळा मंगळवारी संध्याकाळी पार पडला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्वराज बोलत होत्या. संपूर्ण कार्यक्रम इंग्रजीतून झाला तरी सुषमा स्वराज यांनी मात्र हिंदीतूनच भाषण केले. स्वराज यांच्यासह बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन, देशातील दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा आणि चिन्मय मिशनचे स्वामी तेजोमयानंद यांना कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अडीच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, चित्र, समई असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मानपत्राचे वाचन संस्कृतमधून करण्यात आल्यामुळे तोच धागा पकडून सुषमा स्वराज म्हणाल्या की, आता संस्कृत केवळ मंत्रोच्चारापुरती उरली आहे. पौरोहित्य करणारा संस्कृत शुद्ध बोलतो की नाही हेही आपल्याला समजत नाही. म्हणूनच आपल्याला मिळालेली पुरस्काराची रक्कम इंडियन एज्युकेशन सोसायटीला संस्कृत भाषेच्या जतन-संवर्धनासाठी देत आहोत असेही स्वराज यांनी जाहीर केले.
यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले की, दादासाहेब फाळके यांनी रोवलेले सिनेमाचे रोपटे आता १०० वर्षांचे झाले आहे. मात्र आपल्या सिनेमाकडे परदेशी लोकांनी नेहमी कुचेष्टेने पाहिले.
आपला सिनेमा हा सर्वसामान्यांसाठी असून दिवसभर काबाडकष्ट करणारा सर्वसामान्य माणूस चित्रपटगृहात येतो तेव्हा पडद्यावरील सुंदर आयुष्य पाहताना काही काळापुरते तरी तो त्याचे दु:ख विसरतो. आपले वडील हरिवंशराय बच्चन त्यांच्या अखेरच्या दिवसांत माझे चित्रपट व्हिडिओवर एकसारखे पाहायचे. त्याबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले की, काव्यगत न्याय वास्तविक आयुष्यात नव्हे तर फक्त या तीन तासांत मिळतो याचा अनुभव आला.
या प्रसंगी सॅम पित्रोदा म्हणाले की, तंत्रज्ञानामध्ये या भारताचे प्रश्न सोडविण्याची ताकद आहे. परंतु, दुर्दैवाने तंत्रज्ञान हे श्रीमंतांचे प्रश्न सोडविण्यापुरतीच मर्यादित राहिले. आता इंटरनेटमुळे सगळे बदलते आहे. भविष्यात त्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव रूजणार आहे. शिक्षण-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताच्या विकासाची व्याख्याही वेगळ्या पद्धतीने आपण बदलू शकू. तरुणांच्या माध्यमातूनच हे साध्य होईल.     
पोलिसाच्या कुटुंबियांना बच्चन यांची मदत
अमिताभ बच्चन यांनी आपल्या पुरस्काराची अडीच लाख रुपयांची रक्कम दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान मरण पावलेले पोलीस हवालदार सुभाष तोमर यांच्या कुटुंबियांना देत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे मी खूप अस्वस्थ झालो. पुरुषांनी महिलांना सन्मानाची, आदराची वागणूक दिली पाहिजे, असे मतही अमिताभ यांनी या वेळी व्यक्त केले.