16 January 2021

News Flash

कर्करुग्णांना ‘संत गाडगेबाबा धर्मशाळे’चा आधार

करोनाकाळातही अखंड सेवा

करोनाकाळातही अखंड सेवा

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : करोनाकाळात एकीकडे सर्वसामान्य रुग्णांची परवड होत असताना, दादर येथील संत गाडगेबाबा धर्मशाळेने मात्र आपले सेवाव्रत अखंड सुरू ठेवले आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या राज्यांतून मुंबईत उपचारांकरिता आलेल्या अनेक कर्करुग्णांनी करोनाकाळात येथे आसरा घेतला आहे. शिवाय टाळेबंदीमुळे मुंबईत अडकलेल्या अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना घरापर्यंत पोहोचवण्याचे कामही या संस्थेने केले.

परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात देशभरातून हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. जवळपास ७५  हजारांहून अधिक कर्करुग्णांवर या रुग्णालयात केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया केल्या जातात. या उपचारांकरिता विलंब लागत असल्याने बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंडपासून देशाच्या कानाकोपऱ्यांतून येणारे रुग्ण दादरच्या दादासाहेब फाळके मार्गावरील संत गाडगेबाबा धर्मशाळेत आश्रय घेतात.

करोनामुळे आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आल्याने अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुंबईत अडकून पडले. अशा काळात संत गाडगेबाबा धर्मशाळा त्यांच्या हक्काचा निवारा बनली. खाण्या-पिण्यासह सर्व अत्यावश्यक सुविधा त्यांना पुरविण्यात आल्या. एप्रिल व मे महिन्यात उपचारानंतर धर्मशाळेत अडकलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना गाडगेबाबा धर्मशाळा व्यवस्थापनाने रुग्णवाहिकेतून सुरक्षितपणे त्यांच्या घरी सोडण्याचेही काम केले.

करोनाकाळात केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार घेण्याकरिता मार्गदर्शन केले जात आहे. तरीही टाटा कॅन्सर रुग्णालयात देशभरातून दररोज शेकडो रुग्ण कर्करुग्ण उपचारांसाठी दाखल होत आहेत. यातील बहुतेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून, अशा सर्व रुग्ण व नातेवाईकांचा आसरा बनण्याचे काम गाडगेबाबा धर्मशाळा करीत आहे.

१९८४ साली संत गाडगेबाबा धर्मशाळा सुरू झाली. दादरच्या या सात मजली धर्मशाळेत सुमारे ७५० लोकांची राहण्याची व्यवस्था आहे. सध्या येथे रुग्ण व नातेवाईक मिळून ५२० लोक राहात असून त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारी व रात्री जेवण आणि सायंकाळी हळद घातलेले दूध व फलाहार दिला जातो. करोनाकाळातही आमचे सर्व कर्मचारी सेवा बजावत आहेत. येथे येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला परत पाठवले जात नाही, असे धर्मशाळेचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी सांगितले.

रुग्णाकडून किती पैसे घेतात?

गाडगेबाबा धर्मशाळेत खोलीसाठी ७० रुपये व हॉलमध्ये राहण्यासाठी ५० रुपये आकारले जातात. यातच नाश्ता व दोन्ही वेळच्या जेवणाचाही समावेश आहे. अनेक रुग्णांकडे तेही पैसे नसतात. अशांसाठीही दानशूर लोक नेहमीच पुढाकार घेऊन त्यांचे पैसे भरत असतात. इगतपुरी येथील एका दानशूर व्यक्तीने ट्रकभर सॅनिटायझर पाठवून दिल्यामुळे रोज सातही मजले तसेच स्वच्छतागृहाचे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करू शकतो. अनेक लोकांनी रोजच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे. त्यासाठी लागणारे पैसे त्यांनी पाठवले असून २०२३ पर्यंतच्या जेवणाच्या तारखा आरक्षित झाल्या आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 12:20 am

Web Title: sant gadge baba dharamshala serve cancer patients in corona period zws 70
Next Stories
1 फेऱ्या वाढल्या, थांबे तेच!
2 नव्या जबाबदारीने शिक्षक हैराण
3 जुन्या इमारतींचे ४० प्रस्ताव वर्षभरापासून पडून
Just Now!
X