वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने उद्या, शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाची नेरुळ येथील रामलीला मैदानात जोरदार तयारी सुरु असून दहा हजार वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाने नवी मुंबई शनिवारी धुमधुमणार आहे. या संमेलनाच्या उदघाटनासाठी केद्रीय कृषिमंत्री शरद पवार शनिवारी नवी मुंबईत येत असून संमेलनाचे अध्यक्षपद अर्थतज्ञ व संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक भूषविणार आहेत.
वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने गेली दोन वर्षे संत साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. या वर्षी हे संमेलन नवी मुंबईतील नेरुळ नगरीत आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अपारंपरिक उर्जा मंत्री गणेश नाईक आहेत. या संमेलनाला काहीही कमी पडू न देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्यांची निवास, खाण-पान या सोयी करण्यात आल्या आहेत. याशिवाय संमेलनाच्या दिंडीवर हेलिकॉफ्टर मधून पुष्पवृष्टी करण्याची योजना आखण्यात आली आहे. शनिवारपासून तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात संत साहित्य व शेती, संत साहित्य व कायदा सुव्यवस्था, संत साहित्य व स्त्री शक्ती, अशा विषयावर कीर्तन व भारुड आयोजित करण्यात आली आहेत. त्यामुळे हे संमेलन श्रवणीय व प्रबोधनात्मक होईल असा आशावाद या संमेलनाचे समनव्यक महादेव बुवा शहाबाजकार यांनी व्यक्त केला आहे.
 या संमेलनात पंढरपूरचे आमदार तात्या डिंगरे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून मरणोत्तर वारकरी विठ्ठल पुरस्कार दिवगंत केशवबापू कबीर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या संमेलनासाठी सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे, राज्यमंत्री सचिन अहिर, राजेंद्र गावित, उपसभापती वसंत डावखरे, उद्योगपती विजय शिर्के, महापौर सागर नाईक ,खासदार डॉ. संजीव नाईक, आणि आमदार संदीप नाईक उपस्थित राहणार आहेत.