मुंबईतील पूर्व-पश्चिम वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्याचे काम आता मार्गी लागत आहे. कुर्ला रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्याचे काम बुधवारी मध्यरात्रीनंतर सुरू झाले असून त्यामुळे मार्चपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
२६ जानेवारी २०१४ च्या मुहूर्तावर सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्याचे काम पूर्ण करण्याची योजना होती. सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता हा गेल्या १० वर्षांपासून काम सुरू असलेला आणि रखडलेला प्रकल्प आहे. हा प्रकल्प कार्यान्वित होण्याचे सात मुहूर्त आतापर्यंत हुकले असून खर्चाचा आकडा ११५ कोटी रुपयांपासून आता ४३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता गर्डर टाकण्याचे अंतिम टप्प्यातील काम सुरू झाल्याने प्रकल्प मार्गी लागत आहे. पश्चिम उपनगरातून थेट पूर्व उपनगरात जाण्यासाठी हा रस्ता दुवा ठरणार आहे. प्रामुख्याने पश्चिम उपनगरातून नवी मुंबई, ठाणे, पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कुर्ला आणि विद्याविहार दरम्यानच्या रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी गर्डर टाकण्याचे काम १ ऑक्टोबरपासून सुरू होणे अपेक्षित होते. पण तशी वेळ मिळाली नव्हती. परिणामी कामाला विलंब झाला. आता मध्य रेल्वेने रोज रात्री तीन तासांचा ब्लॉक मंजूर केला आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर ५१ मीटर लांबीचे दोन गर्डर टाकण्यात आले. या दोन्ही गर्डरचे एकत्रित वजन १४० टन आहे. अंतिम टप्प्यातील १४ गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी २१ दिवसांची मुदत रेल्वेकडून मिळाली आहे. रेल्वेकडून ब्लॉक आणि मुदत मिळालेली असल्याने आता गर्डरचे काम न रखडता मार्गी लागेल. त्यानंतर त्यावरील रस्त्याचे बांधकाम होऊन मार्च २०१४ पर्यंत सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता प्रकल्प पूर्ण होईल, असे ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.