कलानगर, शीव आणि अमर महल या तीन ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवणारा आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला पूर्व द्रुतगती महामार्गाशी जोडणारा सांताक्रुझ-विक्रोळी जोडरस्ता आठवडाभरात मुंबईकरांसाठी खुला करण्याची घोषणा एमएमआरडीएतर्फे करण्यात आली आहे. या रस्त्यावरील काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रस्त्यावरचे दिवे अद्यापही लागलेले नाहीत. तरीही येत्या २४ तारखेला मुंबईत असलेल्या मतदानाकडे लक्ष ठेवून सत्ताधाऱ्यांनी ही घोषणा केल्याची चर्चा सुरू आहे.
या नव्या रस्त्यामुळे पश्चिम ते पूर्व द्रुतगती महामार्ग हे अंतर फक्त २० मिनिटांत कापता येणार आहे. या मार्गाबरोबरच अमर महल येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर अमर महल, शीव येथे आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलानगर भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते. दोन्ही मार्गावरील वाहनांना परस्पर दिशेने जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. सध्या वाहतूक कोंडीत हे अंतर कापण्यासाठी तब्बल एक ते दीड तासांचा अवधी लागतो. त्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरून शीवपर्यंत जाऊन तेथून कलानगर जंक्शन गाठून मग पश्चिम द्रुतगती महामार्गाला जावे लागते. हा वळसा कमी करण्यासाठी आणि या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीएने सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता बांधला आहे. या रस्त्यामुळे हे अंतर आता फक्त २०-२५ मिनिटांत कापणे शक्य होणार आहे.
हा रस्ता सुरू करतानाच अमर महल जंक्शन आणि सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता यांना जोडणारा उड्डाणपुलही सुरू केला जाणार आहे. अमर महल जंक्शन हे जंक्शन पूर्व द्रुतगती महामार्गावरी महत्त्वाच्या जंक्शनपैकी एक आहे. येथे पाच ठिकाणांहून रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा उड्डाणपुल खुला करणे आवश्यक आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने काही दिवसांपूर्वी जोडरस्त्याच्या रखडलेल्या कामांबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या महत्त्वाच्या रस्त्यावर अद्याप पथदिवे लागलेले नाहीत. त्याचप्रमाणे हा जोडरस्ता अमर महलच्या आधी जेथे उतरतो, तेथे अद्याप रस्त्याचे काम बाकी आहे. पण २४ तारखेला असलेले मतदान डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधारी पक्षाच्या खात्यावर आणखी एक ‘विकासकाम’ जोडले जावे, यासाठी हा रस्ता तातडीने येत्या आठवडय़ाभरात खुला केला जात आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे.