हत्येच्या गुन्हय़ात मृत व्यक्तीची ओळख पटत नाही तोवर तपासाला दिशा आणि वेग मिळत नाही. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी मृत व्यक्तीची ओळख पटू नये, पोलिसांची दिशाभूल व्हावी, आपल्यामागे ससेमिरा लागू नये यासाठी बराच खटाटोप करतात. त्यात मृतदेह जाळून, पुरून नष्ट केले जातात. चेहेरा विद्रूप करण्यासाठी मृतदेहावर अनन्वित अत्याचार केले जातात. अशा परिस्थितीत पोलिसांना मृतदेह सापडलाच तरी ही व्यक्ती कोण हे शोधणे आव्हान ठरते. त्यासाठी मृत व्यक्तीचे छायाचित्र, त्याचा पेहराव, शरीरावरील विशेष खूण जाहीर करून त्याआधारे त्याचे नातेवाईक, ठावठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू होतात. ६ डिसेंबरला वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर नायलॉनच्या मोठय़ा पिशवीत भरलेला, ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह वाहून आला. पुढल्या काही तासांमध्ये साहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांताक्रुझ  पोलिसांनी अवघ्या आठ तासांत महिलेची ओळख पटवली आणि तिची हत्या करणारा आरोपीही गजाआड केला.

नायलॉनची मोठी पिशवी, मृत महिलेने अंगात घातलेला गाऊन, अंतरवस्त्रे, मंगळसूत्र आणि तिच्या भोवती गुंडाळलेल्या दोन चादरी, असा मुद्देमाल पोलिसांनी मृतदेहासोबत हस्तगत केला. अन्य वस्तूंच्या पाहाणीतून महिलेची ओळख पटणे अशक्य होते. पण पोलिसांनी धीर सोडला नाही. त्यांनी मृतदेहाची अधिक बारकाईने पाहणी केली. मृतदेहाच्या मानेवर आणि पोटावर ब्लेड किंवा अन्य धारदार हत्याराने झालेल्या जखमांचे अनेक व्रण आढळले. हे व्रण जखम भरल्यानंतरचे होते. ते पाहून पोलिसांचे तर्कचक्र वेगाने फिरू लागले.

अमलीपदार्थाच्या आहारी गेलेल्यांच्या शरीरावर असे व्रण अनेकदा आढळतात. तल्लफ लागली आणि अमलीपदार्थ न मिळाल्यास अनेकदा आत्मक्लेशातून स्वत:वरच हल्ला करून घेतला जातो, हे माहीत असल्याने ही महिला अमलीपदार्थाच्या आहारी गेलेली असावी, याच व्यवहारातून वाद घडला असावा आणि अमलीपदार्थ विक्रेत्यांनी तिची हत्या केली असावी, हा अंदाज पोलिसांच्या मनात आकार घेत होता. सासुरवासातूनही अशा जखमा होऊ शकतात, असाही एक विचार पुढे आला. मृतदेहाच्या पाहाणीतून ही महिला देहविक्री करणारी असावी, अशीही शंका उपस्थित झाली. हे तर्कचक्र फिरत असतानाच महिलेच्या पाठीवर गोंदलेला टॅटू पोलिसांना आढळला. परीचे चित्र असलेला आणि शरीरावर कायमस्वरूपी राहणारा टॅटू आढळला. महिलेची ओळख पटवण्यासाठी ही खूण महत्त्वाची आहे, हे क्षणात ओळखून पोलिसांनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. काहींनी टॅटूचे छायाचित्र आपल्या खबऱ्यांच्या हाती देऊन शोधाशोध सुरू केली. तर काहींनी टॅटू गोंदवणाऱ्याचा शोध सुरू केला.

ही महिला देहविक्री करणारी असावी, असा एक अंदाज बांधून वर्सोवा, जुहू, ओशिवरा, अंधेरी या भागातील देहविक्री करणाऱ्या महिला आणि टॅटू गोंदवणाऱ्यांकडे चौकशी सुरू झाली. एका कुंटणखान्यात महिलेची ओळख पटली. काही वर्षांपूर्वी शकुंतला ही महिला या कुंटणखान्यात काम करत होती. मात्र दोनेक वर्षांपूर्वी तिने लग्न केले आणि वर्सोव्यात पतीसोबत राहात होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, दुसऱ्या पथकाने गोंदवणाऱ्याला गाठले. त्याने टॅटू आणि मृतदेहाचे छायाचित्र ओळखले. ही महिला वर्सोव्यातील शास्त्रीनगर परिसरात राहाते, अशी तुटक माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी कवठे खाडीकिनाऱ्यावर वसलेले शास्त्रीनगर गाठले. मृतदेहाचा फोटो शास्त्रीनगरातील रहिवाशांनी ओळखला आणि ते पोलिसांना तिच्या घरी घेऊन आले.

पोलिसांनी प्रभुप्रसाद साहा (३८) याच्याकडे चौकशी सुरू केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या साहाला पोलिसांनी बोलते केलेच. देहविक्री करणाऱ्या शकुंतलाशी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. मात्र तिच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून दोघांमध्ये वरचेवर वाद होत होते. ५ डिसेंबरला साहा घरी आला तेव्हा शकुंतला दार उघडत नव्हती. दाराआडून बाहेरून वादाला तोंड फुटले. रागाच्या भरात साहा छतावर चढला. छप्पर उचकटून बांबूच्या साहाय्याने त्याने शकुंतलाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अखेर घाबरलेल्या शकुंतलाने दार उघडले. आत शिरताच साहाने तिचा गळा आवळला आणि ठार केले. त्यानंतर त्याने शकुंतलाचा मृतदेह दोन चादरींमध्ये गुंडाळला, नायलॉनच्या मोठय़ा पिशवीत कोंबला आणि खाडीकिनारी असलेल्या निर्जन ठिकाणी नेला. पुढे तो खाडीत फेकून दिला.

आरोपी पती सोडल्यास शकुंतलाला नातेवाईक नाहीत. त्यामुळे तिची विचारपूस, चौकशी करणारे कोणीही नव्हते. त्यामुळे ती गायब आहे याची तक्रार पोलिसांपर्यंत आली नसती. टॅटू नसता तर कदाचित तिची ओळख पटवणे आव्हान ठरले असते. त्यात वेळ गेला असता आणि आरोपी साहा पसार होऊ शकला असता. मृतदेहाची ओळख पटल्यावर त्या व्यक्तीचे तपशील समजतात. त्याच्या नाव, पत्ता, व्यवसायासोबत मित्र, शत्रू, व्यवहार, वाद, वैमनस्य या व असे विविध पैलू उलगडतात. त्यातून वाट काढत काढत, साखळी तयार करत करत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचतात. शकुंतलाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी हेच कौशल्य वापरून आरोपीला गजाआड केले.