News Flash

‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल नेत्यांमध्येच विश्वासाचा अभाव’

केंद्रामध्ये पुढील दहा वर्षे तरी आघाडी सरकारांचेच राज्य राहील, असे भाकीत करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यंदाच्या निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष असेल,

| April 2, 2014 02:42 am

‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल नेत्यांमध्येच विश्वासाचा अभाव’

केंद्रामध्ये पुढील दहा वर्षे तरी आघाडी सरकारांचेच राज्य राहील, असे भाकीत करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यंदाच्या निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष असेल, असा अंदाज वर्तवला आहे. देशातील आघाडय़ांचे राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, काँग्रेससोबतची आघाडी तसेच नरेंद्र मोदींपासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतच्या सर्व प्रश्नांना शरद पवार यांनी स्पष्ट उत्तरे दिली. लोकसभा निवडणुकीतील आणि नंतरच्या राजकारणाचा वेध घेणारी शरद पवार यांची लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी संतोष प्रधान यांनी घेतलेली ही मुलाखत.
गेल्या तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला खासदारांचा दुहेरी आकडा गाठणे शक्य झालेले नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप झाले. यातून पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला. त्यातून यंदा पक्षाला चांगल्या यशाची अपेक्षा आहे का ?
– यंदा नक्कीच राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल हा माझा ठाम विश्वास आहे. राज्यात ठिकठिकाणी प्रचारानिमित्त फिरतो तेव्हा आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचे चित्र बघायला मिळते. राज्यात आघाडीची व विशेषत: राष्ट्रवादीची पीछेहाट होणार हे चित्र प्रसार माध्यमांनीच रंगविले आहे. प्रत्यक्ष परिस्थिती तशी नाही. आरोप राष्ट्रवादीला नवीन नाहीत. मी मुख्यमंत्री असताना माझ्यावर केवढे आरोप झाले होते. दाऊद इब्राहिमपासून भूखंड लाटणे, असे विविध आरोप झाले होते. आपल्या हातून काहीही चुकीचे झालेले नसल्याने मी अजिबात व्यथित झालो नाही. विरोधक दररोज आरोप करीत होते. माझ्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तसूभरही काही निघाले नाही. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही आरोपात काही तथ्य नाही, अशी भूमिका मांडली होती. आता आरोप झालेले छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या दोन मंत्र्यांना आम्ही रिंगणात उतरविले आहे. दोघेही निवडून येतील. आरोप झाले म्हणजे सारे संपले असे नाही. शक्तिस्थळावर हल्ले चढविण्याची भाजपच्या मंडळींची जुनीच सवय आहे. अजित पवार यांच्यावरही सिंचनप्रकरणी आरोप झाले. सिंचन प्रकल्पांचा खर्च का वाढतो याची माहिती नसलेले आरोप करतात. डॉ. चितळे समितीचा अहवाल जाहीर झाल्यावर सारे सत्य उघड होईल.
अलीकडच्या काळात आपली वक्तव्ये वादग्रस्त ठरली आहेत. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मांडलेल्या भूमिकेमुळे वादळ निर्माण झाले. यूपीएपेक्षा अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार चांगले होते हे मत मांडलेत. यामुळे राष्ट्रवादीच्या विश्वासाहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते, याबद्दल आपले मत काय?
– माझी भूमिका स्पष्ट आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर राखावा, अशी भूमिका मी मांडली होती. यातून मोदी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न नव्हता. दंगलीचा फटका बसलेल्यांची भेट घेण्यासाठी जाणे हे मोदी यांचे कर्तव्य होते. मुंबई बॉम्बस्फोटानंतर जखमींची विचारपूस करण्यासाठी मी जाणार म्हटल्यावर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी न जाण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात गेल्यावर जखमींच्या संतप्त नातेवाईकांनी घोषणा दिल्या, पण मी त्यांना सामोरे गेलो. लोकांना भेटल्यावर त्यांचा राग निवळला. मोदी यांना तसे करता आले असते, पण मोदी यांच्या राजकारणाची दिशाच वेगळी आहे. यूपीएपेक्षा वाजपेयी सरकार वेगळे होते हे वेगळ्या अर्थाने बोललो होतो, पण त्याचा अर्थ आपण काँग्रेसच्या विरोधात आहे, असा काढला गेला. वास्तविक मित्रपक्ष शेवटपर्यंत वाजपेयींबरोबर राहिले. राष्ट्रवादी व नॅशनल कॉन्फरन्स वगळता बाकीचे मित्र पक्ष यूपीएपासून दूर गेले. या अर्थाने आपण तसे वक्तव्य केले होते. दोनदा मतदान करण्याचा सल्ला आपण विनोदाने दिला होता. ते वक्तव्य प्रसार माध्यमांनी गांभीर्याने घेतले. माझी भूमिका स्पष्ट असून, त्यात काहीही बदल झालेला नाही. परिणामी राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेबद्दल निर्माण करण्यात येणारे प्रश्नचिन्हच मुळात चुकीचे आहे.
काँग्रेसच्या यशाबद्दल साशंक असल्यानेच तुम्ही काँग्रेसच्या विरोधात विधाने करता किंवा राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेप आहे, अशी चर्चा आहे. याबद्दल काय?
– काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर गेली दहा वर्षे अत्यंत उत्तम संबंध राहिले. सरकारच्या कारभारात त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. आघाडीच्या सरकारबद्दल मी काही मते मांडली. याचा अर्थ काँग्रेसच्या विरोधात आहे असे नाही. राहुल गांधी यांच्याबरोबर कधीच काम केलेले नाही. यामुळे त्यांच्याबद्दल मी काय मत मांडणार? देशाचे नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे, पण त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात आधी काम केले असते तर बरे झाले असते.
केंद्रात कोणत्या आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा आपला अंदाज आहे?
– आजच्या घडीला भाजप पहिल्या क्रमांकावर, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहील, असा अंदाज आहे. देशात आणखी १० ते १५ वर्षे आघाडय़ांच्या सरकारचे दिवस राहणार आहेत. प्रादेशिक पक्षांची ताकद वाढल्याने त्या त्या राज्यांमधून प्रादेशिक पक्षांचे खासदार निवडून येतील. प्रादेशिक पक्षांना सत्तास्थापनेत महत्त्व येणार आहे. १९९६ मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आम्ही सर्वानी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना विनंती केली होती, पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्याला विरोध केला. मग देवेगौडा आणि गुजराल पंतप्रधान झाले. यंदा कोणत्या नेत्यावर सहमती होईल, असे नाव दिसत नाही. मोदी यांची हवा तयार करण्यात आली असली तरी मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. आमचा पक्ष छोटा असल्याने माझ्या नावाचा विचार होण्याची शक्यता नाही.
आपण म्हणता राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल. राष्ट्रवादीचे १० ते १२ खासदार निवडून आले आणि भाजपला जादूई आकडा गाठण्याकरिता संख्याबळ कमी पडत असल्यास अशा वेळी तुमची भूमिका कोणती राहील वा भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा पर्याय खुला राहील का?
– भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. अशी वेळ आल्यास विरोधी बाकांवर बसू, पण भाजपबरोबर जाणार नाही. नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. त्यांच्या विचारसरणीशी आम्ही कधीच एकरूप होऊ शकत नाही. किती काहीही झाले तरी राष्ट्रवादी भाजपला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देणार नाही.
राज्यात विरोधकांचे आव्हान किती आहे? मनसे पक्ष एवढा प्रभावी राहिलेला नाही, अशी चर्चा होते. याबद्दल आपले मत काय?
– मनसेला दुर्लक्षून चालणार नाही. मनसेने स्वत:ची अशी मतपेढी तयार केली आहे. मनसेला मिळणाऱ्या मतांमध्ये ७० टक्के मते ही शिवसेनेची असतात. गेल्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी लाख-दीड लाख मते घेतली होती. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्रात फार काही अस्तित्व जाणवत नाही. मनसेने फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले व भाजपच्या विरोधात का केले नाहीत हा त्या पक्षाचा अधिकार असतो. शेवटी उमेदवार कोठे उभे करायचे हा निर्णय त्या पक्षप्रमुखाने घ्यायचा असतो.
शिवसेनेने आपल्याला लक्ष्य केले असून, उद्धव ठाकरे हे सातत्याने तुमच्याविरुद्ध बोलत आहेत. याबद्दल..
– शरद पवार यांना एनडीएमध्ये प्रवेश देणार नाही, असे उद्धव ठाकरे सांगतात, पण आम्ही कोठे एनडीएमध्ये चाललो आहोत. शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल काय बोलणार? शिवसेनेचे गेल्या वेळी निवडून आलेल्या ११ पैकी आठ खासदार आमच्या पक्षात येण्याच्या तयारीत होते. चार जण बाहेर पडले. सर्वाना उमेदवारी देणे आम्हाला शक्य नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकांना मोठे केले. यातूनच मनोहर जोशी यांच्यासारख्या सामान्याला महत्त्वाची पदे मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार माझ्या भेटीला येतात. त्यांच्या बोलण्यातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांना विश्वास वाटत नाही. शिवसेनेची एक ताकद होती. ही ताकद आता तेवढी दिसत नाही.
नरेंद्र मोदी यांनी आपल्याला शेतीपेक्षा क्रिकेटमध्ये जास्त रस असल्याचा आरोप केला आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय?
– मी मुंबई क्रिकेटचा अध्यक्ष असलो तरी दैनंदिन कामकाज माझे सहकारी बघतात. कृषिमंत्री म्हणून शेती अणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. गेल्या दहा वर्षांत कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. मोदी माझ्यावर आरोप करतात, पण स्वत: नरेंद्र मोदी हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्याचे काय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2014 2:42 am

Web Title: santosh pradhan taken interview of sharad pawar for loksatta
टॅग : Loksatta,Sharad Pawar
Next Stories
1 संपामुळे बेस्टचे साडेतीन कोटींचे नुकसान
2 मुजोर शरद रावांचीच आंदोलनाला फूस!
3 शक्ती मिल बलात्कार प्रकरण : फसवून गोवण्यात आल्याचा आरोपींचा दावा
Just Now!
X