वांद्रे बँड स्टँड येथील समुद्रात बुडणाऱ्या तीन तरुणींना वाचविण्याच्या प्रयत्नात प्राण गमाविणाऱ्या रमेश वळंजू यांच्या कुटुंबीयांना सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या सारस्वत बँकेने मोठा आधार दिला आहे. वळंजू यांच्या पत्नी कल्पना वळंजू यांना बँकेच्या नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वळंजू यांच्या मागे आई, पत्नी, दोनी मुली आणि अडीच वर्षांचा एक मुलगा आहे.
वळंजू यांच्या संदर्भातील वृत्तपत्रातील बातमी वाचून बँकेचे उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या मनुष्यबळ विकास समितीचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्या सूचनेनुसार बँकेच्या उपकार्यकारी संचालिका स्मिता संधाने आणि परिमंडळ एकच्या प्रमुख शिल्पा मूळगावकर यांनी वळंजू यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
कल्पना वळंजू यांना सारस्वत बँकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याबाबतचे पत्रही त्यांना सुपूर्द करण्यात आले.
वांद्रे बँड स्टँड येथे समुद्रात बुडणाऱ्या दोन जोडप्यांना वाचविताना स्वत:चा जीव गमाविणारे मालवणचे मोहन रेडकर यांच्या बंधूंना सारस्वत बँकेने २००८मध्ये नोकरीत समावून घेतले होते. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनाही बँकेत नोकरी देऊन आधार दिला होता.