सारस्वत बँकेच्या शतकपूर्ती सोहळ्यात शरद पवार यांची सूचना

राष्ट्रीयकृत बॅंका अडचणीत आल्या तेव्हा केंद्र सरकारने ८६ हजार कोटी रुपयांची मदत त्यांना केली. पण सहकार क्षेत्रातील बॅंक किंवा दुसरी संस्था अडचणीत आली की तिच्यावर चौकशीची, बरखास्तीची कारवाई केली जाते. सहकार क्षेत्रातील संस्था या सामान्य माणसाला मदत करणाऱ्या असतात हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांच्याबाबतीतही मदतीची भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

सारस्वत सहकारी बॅंकेचा शतकपूर्ती समारंभ शनिवारी वरळी येथील वल्लभभाई पटेल स्टेडियममधील सभागृहात झाला. शरद पवार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. बॅंकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने, संचालक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  खासदार अनिल देसाई उपस्थित होते. मधु मंगेश कर्णिक लिखित शताब्दी सारस्वत आणि पी. एन. जोशी लिखित आर्थिक व बॅंकिंग धोरणांच्या बदललेल्या छटा या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

देशातील एकूण सहकारी बॅंकांपैकी जवळपास ७० टक्के बॅंका या तीन राज्यांत आहेत. राष्ट्रीय बॅंकेत वेश बघून कर्ज देतात. त्यामुळे कोट-टाय बांधलेल्या माणसांना तेथे महत्त्व मिळते. तर तलासरीच्या आदिवासी खेडूताला त्यांच्या लेखी पत नसते. त्यामुळेच राष्ट्रीय बॅंकांच्या तुलनेत सहकारी बॅंका ग्रामीण भागातील लोकांना आपल्या वाटतात. तेथील स्थानिक नेतृत्व हे या सहकारी बॅंकिंगशी संबंधित असते. त्यामुळे नेतृत्वाला या सामान्य माणसांच्या गरजांची माहिती असते. सहकारी बॅंका छोटय़ा माणसाला प्रोत्साहित करतात. त्यामुळेच या क्षेत्राचे महत्त्व मोठे आहे, असे पवार यांनी विशद केले.

देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था सध्या एक हत्ती व सात आंधळ्यांसारखी झाली आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने विश्लेषण करत आहे. रोज बॅंका बुडाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आता प्रकाशित झालेले आर्थिक धोरणांबाबतचे पुस्तक महत्त्वाचे आहे. नोटाबंदी व इतर आर्थिक-बॅंकिंग धोरणांचे परिणाम त्यामुळे लक्षात येतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला. त्याचबरोबर अशा परिस्थितीत सारस्वत बॅंकेची कामगिरी मोलाची आहे, असे कौतुकही त्यांनी केले.

‘सारस्वत’ला सहकारातच रस

सारस्वत बॅंकेचा पसारा ५० हजार कोटी रुपयांपेक्षा मोठा झाला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातून बाहेर पडून खासगी वाणिज्य बॅंक होण्यासाठी आम्हाला आग्रह केला जात आहे. पण आमची अजिबात तशी इच्छा नाही. आम्हाला सहकारी बॅंक म्हणूनच वाढायचे आहे, केवळ तसे पोषक वातावरण, धोरणे देशात असावीत असे गौतम ठाकूर यांनी स्पष्ट केले. युरोपात खूप मोठय़ा सहकारी बॅंका आहेत. सारस्वत बॅंक आज आशियातील सर्वात मोठी सहकारी बॅंक म्हणून ओळखली जात असली तरी पुढील १०० वर्षांत सारस्वत बॅंक जगातील आघाडीची सहकारी बॅंक व्हावी हे आमचे स्वप्न आहे, असे उद्दिष्टही गौतम ठाकूर यांनी जाहीर केले. तसेच लवकरात लवकर एक लाख कोटी रुपयांचा टप्पाही गाठायचा आहे, असेही ते म्हणाले.