सारथी संस्थेसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत बसवण्यात आल्याने गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. सारथीवरुन वाद निर्माण होऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी छत्रपती संभाजीराजे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. बैठकीत छत्रपती संभाजीराजे तिसऱ्या रांगेत बसल्याचं पाहून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनाही नाराजी दर्शवत गोंधळ घातला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सारथीची बैठक बोलावण्यात आली होती. उपमुख्यंत्री अजित पवारही बैठकीला उपस्थित होते. बैठकीत छत्रपती संभाजीराजे तिसऱ्या रांगेत बसलेले पाहून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनाही गोंधळ घालत त्यांना व्यासपीठावर बसवण्याची मागणी करण्यास सुरुवात केली.

सर्वांनी संभाजीराजे यांना मंचावर बसण्याची विनंती केली. मात्र छत्रपती संभाजीराजे यांनी सामंजस्याची भूमिका घेत आपण सारथी संस्थेसंबंधी तोडगा काढण्यासाठी आलो असल्याचं सांगत शांतता राखण्याचं आवाहन केलं. आपणही एक सदस्य म्हणून खालीच बसू अशी भूमिका त्यांनी घेतल्याने प्रकरण शांत झालं आणि बैठकीला सुरुवात झाली.

दरम्यान अजित पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांची काही मोजक्या प्रतिनीधींसोबत चर्चा सुरु आहे आहे. सभागृहात सुरु झालेली ही बैठक सध्या अजित पवारांच्या दालनात सुरु आहे. मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी आज तोडगा निघेल असा विश्वास प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.