कांदिवलीच्या दामूनगरमधील नऊवारी नेसणाऱ्या वृद्ध रहिवासी महिलांची निकड ओळखून काही स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सिलेंडर स्फोटामुळे आग लागून येथील हजारो संसारांची काही तासांतच राखरांगोळी झाली.आगीचे वृत्त पसरल्यानंतर अनेक स्वयंसेवी संस्था त्यांच्या मदतीला धावून आल्या.
अन्नपदार्थाबरोबरच कपडे, भांडीकुंडी असा मदतीचा ओघ सुरू झाला. कपडय़ांचे ढिगारेच्या ढिगारे सध्या दामूनगरमध्ये पडून आहेत. त्यात या वस्तीत राहणाऱ्या आणि विशेषकरून मराठवाडय़ातून आलेल्या वृद्ध महिलांची गरज वेगळीच होती. या महिलांना नऊवारी साडय़ा नेसण्याची सवय असल्याने मदतीतून मिळणाऱ्या सहावारी साडय़ांचा त्यांना काहीच उपयोग होत नव्हता. ‘निर्मला निकेतन’ या सामाजिक कार्याचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यायातील ३२ विद्यार्थ्यांनी येथे तीन दिवस पाहणी करून रहिवाशांच्या गरजा जाणून घेतल्या. त्यात येथील मराठी कुटुंबांमधील महिलांची नऊवारी साडय़ांची निकड समोर आली. या भागात मराठवाडय़ातून आलेली अनेक कुटुंबे आहेत. या कुटुंबातील स्त्रिया खासकरून ज्येष्ठ महिला नऊवारी लुगडी नेसतात. याबाबत ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त छापून आल्यानंतर गोरेगावच्या ‘अंबामाता मंदिर’ आणि ‘सिल्व्हर इनिंग’ या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेने पुढाकार घेत दामूनगरमधील महिलांकरिता ९० नऊवारी साडय़ांची मदत करण्याचे ठरविले. याशिवाय ७५ नवीन ब्लँकेट खरेदी करून ती येथील गरजू रहिवाशांना संस्थेतर्फे वाटण्यात आली. संस्थेच्या पिंकी राठोड यांनी या मदतीतील मोठा वाटा उचलला. संस्थेच्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी नुकतेच साडय़ा आणि ब्लँकेटचे वाटप येथे केले.