News Flash

काळाचा ‘पट’ उलगडतोय

‘जय मल्हार’ मालिकेतील म्हाळसा आणि बानू यांच्यात रंगणारा सारीपाटाचा डाव कोण जिंकणार

‘जय मल्हार’ मालिकेतील म्हाळसा आणि बानू यांच्यात रंगणारा सारीपाटाचा डाव कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा खेळ कसा खेळला जातो, त्याचे नियम काय असतात याबाबत नवीन पिढी संभ्रमात पडेल. मात्र, रायगड जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात हा खेळ अजूनही आवडीने खेळला जात असून त्याची जपणूक करण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी होत आहेत.आपल्या पौराणिक कथांमध्येही या खेळाचे दाखले आढळतात. महाभारतात जो द्युत खेळला गेला तो देखील सारीपाटच होता. काही ठिकाणी या खेळाला पट असे संबोधले जाते. काळाच्या ओघात नवनवीन खेळ दाखल झाल्याने या खेळाची लोकप्रियता कमी होत गेली. मोबाईल आणि व्हिडीओ गेम्सच्या जमान्यात तर हा खेळ जवळपास नामशेषच झाला आहे. ‘जय मल्हार’ मालिकेमुळे हा खेळ नव्याने चर्चेत आला असून त्याला संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अलिबाग तालुक्याच्या ग्रामीण भागात तरुणांपासून ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्व जण हा खेळ अद्यापही खेळतात. या खेळाची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी सारीपाटाच्या स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यात परहुर या गावात झालेल्या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता.

कसा खेळतात?
अतिशय मजेशीर असणारा हा खेळ नशिब आणि बुद्धीचातुर्याची कसोटी पाहणारा असतो. मधोमध सारीपाट मांडून दोन संघ समोरासमोर बसतात. कवडय़ांनी दान टाकले जाते. सारीपाटावर ९६ घरे असतात, प्रत्येक सोंगटी ही सर्व घरे फिरून येते. सारीपाटाच्या मधोमध दिवा ठेवला जातो. हा दिवा साक्षीदार मानला जातो. शासनाने या खेळाला प्रोत्साहन दिले तर अडगळीत पडलेल्या सारीपाटाला उर्जतिावस्था प्राप्त होईल, असा विश्वास सुनील बुरूमकर यांनी व्यक्त केला .

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 9:53 am

Web Title: saripat game
Next Stories
1 ‘ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट’कडून विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन अ‍ॅप
2 लहान धरणे, बंधारे यांची अधिक गरज
3 सलमान पुन्हा अडचणीत
Just Now!
X