दिनेश गुणे, मुंबई

पुण्याजवळ चाकण आळंदी मार्गावरील कोयाळे नावाच्या एकाकी गावात एक आगळे वन फुलत आहे.

गेल्या पाच वर्षांच्या श्रमपर्वाची फळे आता दिसू लागली आहेत. मराठवाडय़ाच्या परभणीजवळील एका खेडय़ात जन्मलेला, तिथेच वाढलेला आणि संगणक अभियांत्रिकीची पदवी घेऊन चांगल्या पगाराच्या नोकरीवर पुण्यात स्थिरावलेल्या पंचविशीतल्या अशोक देशमाने नावाच्या तरुणाला दारिद्रय़, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या या दुष्टचक्राने अस्वस्थ केले. या ‘नाही रे’ वर्गाच्या भविष्यातील पिढीकडे लक्ष दिले नाही, तर हे चक्र कधीच संपणात नाही, या भीतीने तो शहारला, आणि अशा पिचलेल्या कुटुंबांतील मुलांसाठी आपले आयुष्य झोकून द्यायचे असे ठरवून त्याने चांगली नोकरी सोडली. पुण्यात भोसरी येथे अडीच खोल्यांचे एक घर मिळविले, आणि मराठवाडय़ातील आत्महत्याग्रस्त, शेतमजूर, गरीब कुटुंबांतील होतकरू मुलांचा शोध घेतला. पित्याच्या मायेने त्यांचा सांभाळ करण्याचे आणि त्या मुलांना शिकवून शहाणे करण्याचे वचन देऊन त्याने ती मुले भोसरीला आपल्या घरी आणली, आणि स्नेहवनचा जन्म झाला..

स्नेहवन हे सुरुवातीस २० मुलांचे कुटुंब होते. या प्रयोगशाळेतून पुढच्या पिढीला आकार देण्याचे स्वप्न जपणे शक्य आहे, अशी उमेद वाढत होती. अशोक देशमानेच्या आईवडिलांनी त्याच्या लग्नाचा विचार सुरू केला, आणि ‘५० मुलांची आई’ होऊन त्यांच्यासाठी निरपेक्षपणे राबण्याची तयारी असलेली मुलगी भेटली, तरच आपण लग्न करू अशी अट घालून अशोक लग्नाला तयार झाला. काही दिवसांतच त्याला तशी मुलगी भेटली, आणि अर्चना व अशोक यांचा विवाह झाला. स्नेहवनच्या मुलांना पित्याचे छत्र लाभलेच होते, आता आईदेखील मिळाली. गेल्या चारपाच वर्षांत हे कुटुंब आणखी विस्तारले आहे. स्नेहवनात ५० निवासी मुले आहेत. भोसरीतीलच नंदी समाजाच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही अशोकने घेतली आहे. त्यांचे पोषण, शिक्षण, गरजांची काळजी आता अशोक आणि अर्चना घेतात. पण ५० मुले असलेल्या संस्थेच्या जागेत त्यांना आणून त्यांचा सांभाळ करण्यात काही अडचणी असतात. जोवर संस्थेकडे स्वयंपूर्ण जागा, स्वतंत्र इमारत, शाळा व मुलामुलींच्या विकासासाठी सर्व सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोवर मुलींना संस्थेत आणायचे नाही, असे त्यांनी ठरविले आहे.

स्नेहवनातील भावी पिढीच्या अंगी नेतृत्वगुण, स्वंयशिस्त, संस्कार, श्रमाचे महत्त्व, अभ्यासू वृत्ती, आरोग्यभान आणि समाजाविषयीचे प्रेम निर्माण व्हावे यासाठी अनेक प्रकल्पांचा संस्थेचा संकल्प आहे. अडीच खोल्यांच्या जागेत हे सारे शक्य नाही, त्यासाठी मोठी जागा हवी, सुविधांच्या उभारणीसाठी मोठा निधी हवा, हे ओळखून अशोकने प्रयत्न सुरू केले, आणि एका अनपेक्षित क्षणी, भोसरीतीलच डॉ. रवींद्र आणि स्मिता कुलकर्णी या दाम्पत्याने त्याला आपल्या जमिनीतील दोन एकर जमीन देणगी म्हणून देऊन टाकली.

गेल्या दीड वर्षांत तेथे स्नेहवनचे आनंदभुवन साकारते आहे. या ठिकाणी सुसज्ज शाळा, प्रयोगशाळा, संगणक केंद्र, संस्कार केंद्र, वाचनालय, गोशाळा, सौरऊर्जा, आदी सुविधा उभे करण्याचे आव्हान आता स्नेहवनसमोर आहे. काहीही झाले तरी, स्वप्नातील हे प्रकल्प आकारास येणारच अशी जिद्द, त्यासाठी वाट्टेल तेवढे श्रम करण्याची तयारी आणि मातापित्याच्या भावनेने मुलांचा सांभाळ करण्याची ईर्षां यांतून स्नेहवन नावाचा हा भविष्याचा प्रकल्प उभा राहिला आहे. बाबा आमटे हे या दाम्पत्याचे दैवत.. त्यांच्याच शब्दांत, येथे उद्याच्या स्वप्नांची नांगरणी सुरू आहे. त्यातून उज्ज्वल भविष्याची शेते फुलणार आहेत. त्या कार्यासाठी त्याला दानशूर हातांची साथ हवी आहे!..