ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांचे घट्ट नाते जोडले गेले आहे ते नर्मदा आंदोलनाशी. याच अनुषंगाने ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’अंतर्गत त्यांनी नर्मदा खोऱ्यात सुरू केलेल्या ‘जीवनशाळे’ने ग्रामीण भागातील आदिवासी, वंचित मुलांच्या आयुष्यात शिक्षणाच्या ज्योती प्रज्वलित केल्या आहेत. त्या तशाच तेवत राहाव्यात यासाठी त्यांना आर्थिक साहाय्याची निकड आहे.

समाजाच्या तळागाळातील, उपेक्षित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी ‘जीवनशाळा’सारखे प्रयोग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अशा प्रयोगांना आर्थिक बळ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे; जेणेकरून या मुलांचे शिक्षण अधिक सहज आणि सुकर होईल.

शैक्षणिक धोरण राबवताना वंचित समाजापर्यंत शिक्षणगंगा पोहोचविण्याचा प्रयत्न असतो. परंतु अनेकदा सरकारी यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या अनास्थेपायी खेडय़ापाडय़ांतील मुले शैक्षणिक धोरणातील लाभांपासून वंचित राहातात. अशा वेळी अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती सामाजिक बांधिलकीतून समर्पण भावनेने वंचितांसाठी ज्ञानदानाचे कार्य करीत असतात. सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी नर्मदा खोऱ्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये सुरू केलेल्या ‘जीवनशाळा’ हे याचे उत्तम उदाहरण आहे.

‘नर्मदा नवनिर्माण अभियान’अंतर्गत या शाळा सुरू करण्यात आल्या. ‘जीवनशाळे’ची सुरुवात झाली १९९२ मध्ये, नंदुरबारमधील चिमलखेडीपासून! आंदोलनातील कार्यकर्त्यांनीच शैक्षणिक तक्ते, फळे, खडू, पुस्तके आणली आणि ‘जीवनशाळा’ सुरू झाली. आपली मुले शिकत आहेत हे पाहून आदिवासींना आनंद झाला. शाळा सुरू केली तेव्हा गावात दोन टक्केही साक्षरता नव्हती, पण काही वर्षांतच ‘जीवनशाळे’ने हे चित्र पालटून टाकले. मेधा पाटकरांनी या शाळेसाठी उत्तमोत्तम मार्गदर्शक, शिक्षक यांचे मार्गदर्शन घेतले. अनिल सद्गोपाल, कृष्ण कुमार (‘एनसीईआरटी’चे माजी संचालक) या दिल्ली विद्यापीठातल्या प्राध्यापकांना बोलावून शिक्षणाच्या आराखडय़ाबाबत चर्चा केली. त्यात ग्रामस्थांनाही सहभागी करून घेतले. शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील, फलटन येथील प्रगत शिक्षण संस्थेच्या डॉ. मॅक्सीन बर्नसन (मावशी) यांच्यामार्फत शिक्षकांना प्रशिक्षण दिले.

या जीवनशाळांना सरकारी मान्यता असली तरी त्या विनाअनुदानित आहेत. ‘स्वयं अर्थसाहाय्य’ या तत्त्वावर सुरू आहेत. त्यांना समाजातील दानशूरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीतही जीवनशाळांतील मुलांनी गेल्या २८ वर्षांत उत्तम शैक्षणिक प्रगती केली आहे. विशेष म्हणजे, क्रीडाक्षेत्रात या मुलांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे. मुलांची क्रीडाक्षेत्रातील प्रगती पाहून दरगाव येथे क्रीडा संकुल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

करोना टाळेबंदीमुळे सर्वत्र शाळा बंद आहेत, मात्र हा भाग करोना प्रतिबंधित नसल्याने जीवनशाळांमधील शिक्षण सुरू झाले आहे. इतकेच नव्हे तर जीवनशाळांमधून शिकलेले दहावी ते बारावीचे विद्यार्थी टाळेबंदीमुळे बंद असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरोघर जाऊन शिकवणार आहेत. या शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी गावातील सुमारे तीनशे मुलांनी नोंदणीही केली आहे.

शिक्षण आणि सामाजिक भानही

‘जीवनशाळे’मुळे नर्मदा बचाव आंदोलनाला एक वेगळी दिशा मिळाली. जीवनशाळेने मुलांना शिक्षणाबरोबरच आपला अधिकार, हक्कयांविषयी अधिक सजग केले. गावातील अनेक तरुण आता राजकारणातही सहभागी होऊ लागले आहेत. जीवनशाळेने मुलांना शिक्षणाबरोबरच सामाजिक भान दिले.