ऐतिहासिक, दुर्मीळ कागदपत्रे हीच ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची ‘श्रीमंती’

विविध भाषांमधील तब्बल २० हजारांपेक्षाही अधिक ऐतिहासिक-दुर्मीळ पण अस्सल कागदपत्रे, एकोणिसाव्या शतकापूर्वीची काही हजार पुस्तके, अश्मकाळापासुनच्या विविध वस्तू-भांडी, ताम्रपाषाण युगातील मानवी संस्कृतीचे अवशेष, दोन-तीनशे वर्षांपूर्वीच्या ३०० ते ४०० पोथ्या,तीन-चारशे वर्षांपूर्वीची ज्ञानेश्वरीची तब्बल ३०० हस्तलिखिते, असंख्य दुर्मीळ चित्रे, ब्रिटिशांनी सन १८१६ मध्ये लंडनला छापलेला भारताचा नकाशा.. ही आहे अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची श्रीमंती!  ती मिरवताना ही संस्था मात्र अठरा विशे दारिद्रय़ाचा सामना करीत उभी आहे. निधीअभावी संस्थेतील संशोधन केंद्र, त्रमासिकही बंद पडले. ही सगळी कागदपत्रे, पोथ्या, पुस्तके, ग्रंथांचे डिजिटलायझेशन, ती जतन करणे, कागदपत्रांचे संशोधन यासाठी मोठा खर्च येणार आहे. मोडी लिपीचे वर्ग हे या संस्थेचे वेगळेपण आहे, त्यालाही आता निधीअभावी मर्यादा पडल्या आहेत.

मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली ती एकाच दिवशी दि. १ मे १९६० ला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र ५६ वर्षांत प्रगतीकडे झेपावला. नगरचे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय मात्र अस्त्विासाठीच झगडते आहे. तरी तुलनेने आता परिस्थती बरी आहे, मध्यंतरी संस्था शेवटचेच आचके देत होती. अगदी ती बंद करावी की काय, या विचाराप्रत मंडळी आली होती. मात्र नेमक्या वेळी संस्थेला आधार दिला तो, दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी. एक नगरकर म्हणूनच त्यांनी पुढाकार घेऊन संस्थेच्या मदतीसाठी नगरमध्येच संगीतरजनी करून संस्थेला आर्थिक पाठबळ दिले. त्यातून उभ्या राहिलेल्या रकमेच्या तुटपुंज्या व्याजातूनच गेली १६-१७ वर्षे संस्थेचा प्रपंच सुरू आहे, तो काटकसरीचाच.

इतिहास संशोधनात मैलाचा दगड!

जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजना या उपक्रमातून संस्थेच्या इमारतीचे मोठे नूतनीकरण सध्या सुरू आहे. त्यामुळे संस्थेच्या इमारतीला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. वस्तुसंग्रहालयाचे हे नवे रूपही आकर्षक आहे. मात्र तरीही प्रश्न आहे, तो कागदपत्रांचे जतन आणि दैनंदिन अस्तित्वाचा. त्याची कोणतीच तजवीज नसल्याने संस्थेचे भवितव्य लोकाश्रयावरच अवलंबून आहे. तो लाभला तर, नगरचे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय ही भावी पिढय़ांसाठी ‘अलिबाबाची गुहा’च ठरेल. त्यासाठीच येथील ऐतिहासिक खजिना योग्य पद्धतीने जतन करणे गरजेचे आहे!