X

रस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा

रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.

|| प्रसाद रावकर

गणेशोत्सव अवघ्या २५ दिवसांवर येऊन ठेपला असतानाही गेली अनेक वर्षे ठिकठिकाणी रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तब्बल १२९५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणीसाठी पालिकेकडे ऑनलाइन अर्जच सादर केलेले नाहीत. रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तब्बल २२०० पैकी सुमारे ९०५ मंडळांनी पालिकेकडे मंडप परवानगीसाठी अर्ज केला असून त्यापैकी १०८ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे, तर त्रुटींमुळे १८९ मंडळांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. पालिका १२९५ मंडळांच्या अर्जाच्या प्रतीक्षेत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. पादचाऱ्यांसह वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडपांना परवानगी देऊ नये. परवानगी नसताना अडथळा ठरणारे मंडप उभे राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने महापालिकेसह अन्य यंत्रणांना दिले आहेत. त्यानंतर पालिकेने मंडप परवानगीबाबतचे नियम कडक केले. यंदा प्रथमच मंडळांकडून मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज मागविले. ऑनलाइन अर्ज करण्याबाबत मंडळांना मदत करण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना सज्ज ठेवले.

सध्या ९०५ मंडळांनी मंडप उभारणीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलिसांच्या ना हरकरत प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या १०८ मंडळांना पालिकेने मंडप उभारणीसाठी परवानगी दिली आहे. १८५ मंडळांचा अर्ज पडतळणीच्या प्रक्रियेत आहे, तर कागदपत्रांची पूर्तता नसलेले सुमारे १८९ अर्ज रद्द करण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांनी २६३ मंडपांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले असून ७१ अर्ज प्रलंबित आहेत. तर स्थानिक पोलिसांनी तीन मंडळांचे अर्ज फेटाळून लावले आहेत. वाहतूक पोलिसांनी २६६ मंडळांच्या मंडपांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले असून ६९ अर्ज ‘ना हरकत’ प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. तर दोन मंडळांचे अर्ज वाहतूक पोलिसांनी फेटाळून लावले आहेत.

बहुसंख्य मंडळांनी अर्जच सादर केलेले नाही. त्यामुळे मंडप परवानगीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.

First Published on: August 19, 2018 2:08 am