सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमास यंदा पाच वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने या उपक्रमातील सर्व संस्थांच्या कार्याचा पुनर्परिचय वाचकांना करून देण्याच्या उद्देशाने पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या शीर्षकानेच या पुस्तकाचे प्रकाशनही मंगळवारी होणाऱ्या स्नेहमेळाव्यात करण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता ग्रंथमाले’तील या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पुण्यातील डायमंड पब्लिकेशन्स. कार्यक्रमाच्या ठिकाणी हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध असेल.
राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची माहिती वाचकांना एकत्रितरीत्या उपलब्ध व्हावी या उद्देशाने काढण्यात आलेल्या या पुस्तकामध्ये ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातील ५१ संस्थांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे.
वाचकांचा सार्थ विश्वास
‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांचा ‘लोकसत्ता’वरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. वाचकांनी सढळ हस्ते संस्थांना केलेली आíथक मदत त्या-त्या संस्थांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘लोकसत्ता’ने केले आहे व यापुढेही ते अव्याहत सुरू राहील. अनेक नामवंतांनीही या उपक्रमाला मन:पूर्वक दाद तर दिलीच, पण या दानयज्ञात ते सहभागीही झाले. जगभरातून अशा असंख्य वाचकांनी पाठविलेल्या धनादेशांचे वितरण मंगळवारी होणार आहे.