निर्यात कंपन्या आणि किरकोळ विक्रेत्यांना थेट मासळीची विक्री करण्याचा निर्णय बोटमालकांनी घेतल्याने घाबरलेल्या व्यापारी आणि दलालांनी अखेर ससून डॉकमध्ये सोमवारी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविले. त्यानंतर बोटमालक आणि खलाशांनी काम बंद आंदोलन मागे घेत मासेमारीसाठी बोटी समुद्रात सोडल्या.
राज्य सरकारने सर्व बंदरांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविण्याचे आदेश दिले असतानाही ससून डॉकमध्ये जुन्याच वजनकाटय़ांचा वापर करण्यात येत होता. ससून डॉकवर मासळी उतरविणारे बोटमालक आणि खलाशांनी याबाबत संबंधित विभागांकडे तक्रार केली होती. मात्र या प्रकरणात कुणीही  लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे बोटमालकांनी बोटी बंदरातच नांगरून काम बंद आंदोलन सुरू केले. बोटमालकांना पाठिंबा देण्यासाठी खलाशीही काम बंद आंदोलनात सहभागी झाले. परिणामी मुंबईत मासळीच्या पुरवठय़ात घट होऊन किमती वाढू लागल्या होत्या. ‘लोकसत्ता’च्या ६ डिसेंबरच्या अंकामध्ये ‘बोटी किनाऱ्याला, दर गगनाला – मासळी पाण्यात.. मुंबैकर जाळ्यात’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध होताच बोटमालकांनी व्यापारी अथवा दलालांऐवजी सहकार तत्त्वाचा अवलंब करून थेट निर्यातदार कंपन्या आणि किरकोळ विक्रेत्यांना मासळी विकण्याचा निर्णय घेतला.
यामुळे व्यापारी आणि दलालांचे धाबे दणाणले आणि त्यांनी तात्काळ सोमवारी ससून डॉकमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविले. त्यामुळे बोटमालक आणि खलाशांनी आंदोलन मागे घेतले आणि मंगळवारी बोटी मासेमारीसाठी खोल समुद्राच्या दिशेने निघाल्या.