‘ससुराल सिमर का’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते आशिष रॉय यांचे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. मूत्रपिंडाचा आजार झाल्याने त्यांना गोरेगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारासाठीही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. सोशल मीडियाद्वारे त्यांनी चाहत्यांना मदतीसाठी आवाहन केलं होतं. रुग्णालयाचं बिल भरणं कठीण होत असल्यामुळे ते काही दिवसांपूर्वीच घरी परतले होते. जोगेश्वरी इथल्या राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आशिष यांची बहीण कोलकाताहून मुंबईसाठी रवाना झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

रुग्णालयातून फोटो केला होता पोस्ट

‘सकाळची कॉफी.. तीसुद्धा साखरेविना.. माझ्या चेहऱ्यावरील हे हास्य नाइलाजामुळे आहे.. भगवान उठा ले मुझे,’ असं त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. आशिष अविवाहित होते. “एकटा राहतो म्हणून सगळं काम स्वत:लाच करावं लागत आहे. आयुष्य हे सहजसोपं नाही”, असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. गेल्या वर्षी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्यानंतर त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा खालावली होती.

आशिष यांनी ‘ससुराल सिमर का’, ‘बनेगी अपनी बात’, ‘ब्योमकेश बक्क्षी’, ‘येस बॉस’, ‘बा बहू और बेबी’, ‘मेरे अंगने में’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘आरंभ’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.