प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांना मेहनतानापोटी मिळालेली सव्वा कोटीची रोकड लुटून ‘जिवाची मुंबई’ करण्याचा नोकराचा डाव वर्सोवा पोलिसांनी यशस्वी होऊ दिला नाही. नोकराला ४८ तासांत अटक करून जवळपास संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले. चार महिन्यांपूर्वी नोकरीवर ठेवलेल्या घरगडय़ाने ही चोरी केली. घरगडय़ांचा तपशील असल्यामुळेच त्याला अटक करणे सोपे झाले.
अंधेरी पश्चिमेकडील यारी रोड येथे कौशिक राहतात. १८ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुमारे एक कोटी २० लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरातील नोकर साजनकुमार (२२) हा देखील बेपत्ता असल्यामुळे त्यांच्यावरच संशय व्यक्त करण्यात आला. साजनकुमारचा मोबाइल बंद होता. मात्र अधूनमधून तो मोबाइल सुरू करीत असल्यामुळे त्याचा ठावठिकाणी कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, गोवंडी आदी परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस पथकांनी केलेल्या तपासणीत तो कुर्ला पूर्व येथील कुर्ला रेसिडेन्सी हॉटेल येथील १०६ क्रमांकाच्या खोलीत तो असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी छापा टाकून साजनकुमारला अटक केली.