नेरूळ येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’ आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आश्रमाचा संचालक सतीश सॅम्युअल (४२) याला ठाणे सत्र न्यायालयाने १३ वर्षांच्या सक्तमुजरीची शिक्षा ठोठावली.
या आश्रमशाळेत साडेपाच ते ९ वर्ष वयोगटातील १९ अनाथ मुली होत्या. सतीश सॅम्युअल हा या आश्रम शाळेचा संचालक होता. वर्षभर या मुलींवर तो लैंगिक अत्याचार करत होता. त्याच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून सप्टेंबर २०११ मध्ये काही मुली पळून गेल्या होत्या.  मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मोहित शहा आणि न्या. चंद्रचूड यांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांच्याकडे सोपविला होता.  या प्रकरणात वैद्यकीय पुरावे मिळणे अत्यंत कठीण होते. परंतु रश्मी करंदीकर यांनी अनेक पुरावे गोळा केले. ठाणे सत्र न्यायालयाचे न्या. रघुवंशी यांनी या पुराव्यांच्या आधारे सॅम्युअलला  १३ वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.