युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी आज निवडणूक

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राज्यातील सर्व नेत्यांनी नगरच्या सत्यजित तांबे यांच्या नावावर सहमती घडवून आणली असली तरी राहुल गांधी यांनी नेमलेल्या संस्थेकडून उद्या निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याने तांबे यांना जास्त मते मिळतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी वाढू नये म्हणून युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक सहमतीने घडविण्यावर भर देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांच्या बैठकीत नगरच्या सत्यजित तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

तत्पूर्वी मावळते अध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांनी सत्यजित तांबे, कुणाल राऊत आणि आमदार अमित झनक या तिन्ही उमेदवारांना पुण्यात पाचारण करून सहमती घडवावी, असा दिल्लीचा निरोप असल्याचे निदर्शनास आणून दिले. यानुसार तांबे हे अध्यक्ष तर राऊत आणि झनक हे उपाध्यक्ष होतील. कदम यांचे सूत्र सर्वानी मान्य केले आहे. सरचिटणीसपदी ११ जागांसाठी १०५ उमेदवार रिंगणात असले तरी माजी खासदार रजनी पाटील व माजी आमदार कै. ससाणे यांचे पुत्र तसेच माजी आमदार संजय दत्त यांचे बंधू ब्रिजकिशोर यांची निवड निश्चित मानली जाते.

निवडणूक सहमतीने होणार असली तरी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस प्रत्यक्ष मतदान घेतले जाईल. कारण माजी निवडणूक आयुक्त जेम्स लिंगडोह यांच्या संस्थेकडून ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. निवडणूक प्रक्रियेनेच निवड झाली पाहिजे, अशी राहुल गांधी यांची योजना आहे.

सत्यजित तांबे-पाटील हे माजी मंत्री व अ. भा. काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांचे भाचे असून, त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद त्यांनी गेले पाच वर्षे भूषविले आहे.