प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबे; राहुल गांधी यांचा प्रयोग फसला

युवक काँग्रेसमध्ये नेत्यांच्या मुला-मुलींना किंवा नातेवाईकांना संधी मिळू नये म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून निवड करण्याचा प्रयोग काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राबविला. पण राज्यात हा प्रयोग सपशेल फसला आहे. कारण निवडणुकीच्या माध्यमातूनही नेत्यांच्या नातेवाईकांनीच सारी महत्त्वाची पदे बळकावली आहेत.

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या निवडणुकीचा निकाल नागपूरमध्ये जाहीर करण्यात आला. अध्यक्षपदी नगरचे सत्यजित तांबे-पाटील तर उपाध्यक्षपदी आमदार अमित झनक व कुणाल राऊत यांची निवड झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी वाढू नये म्हणून राज्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र बसून तोडगा काढला होता. त्यानुसार तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतूनच पदाधिकारी नेमण्याचा आदेश दिल्याने निवडणुकीची औपचारिकता पार पाडण्यात आली. यात अध्यक्षपदी तांबे यांनाच सर्वाधिक मते मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. युवक काँग्रेसचे मतदार असलेल्यांना कोठे मतदान करायचे हे आधी समजावून सांगण्यात आले होते. यामुळे निवडणूक प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे फार्सच होता. सत्यजित तांबे यांना ७० हजार १८९ मते मिळाली. आमदार झनक यांना ३२ हजार ९९९ मते तर कुणाल राऊत यांना ७ हजार ७४४ मते मिळाली.  सत्यजीत तांबे यांना ३७,१९० मते जास्त मिळाली.

सत्यजित तांबे-पाटील यांनी नगर जिल्हा परिषदेचे सदस्य असून, आमदार सुधीर तांबे यांचे पूत्र तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यांची आई संगमनेरच्या नगराध्यक्षा आहेत. उपाध्यक्षपदी निवड झालेले आमदार अमित झनक हे माजी मंत्री सुभाष झनक यांचे पूत्र आहेत. झनक यांच्या मृत्यूनंतर अमित हे विधानसभेवर निवडून आले आहेत. दुसरे उपाध्यक्ष कुणाल राऊत हे माजी मंत्री  व काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत यांचे पूत्र आहेत.

सरचिटणीसपदी निवड झालेल्यांपैकी आदित्य पाटील  हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनीताई पाटील यांचे पूत्र आहेत. दुसरे सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त हे माजी आमदार आणि काँग्रेसचे तमिळनाडूचे प्रभारी संजय दत्त यांचे बंधू आहेत. ६० सदस्यांच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नातेवाईकांचाच  भरणा आहे. नेत्यांच्या नातेवाईकांचा भरणा अधिक असल्याने निवडणुकीचा काय उपयोग झाला, असा सवाल केला जात आहे.