तत्कालीन बडोदा संस्थानिकांचे वंशज आणि बडोदा मतदारसंघाचे लोकसभेत दोनदा प्रतिनिधीत्व केलेले सत्यजित गायकवाड यांना बडोद्यातून निवडून येणे अवघड जात असल्याने त्यांची नजर आता महाराष्ट्राकडे लागली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने बडोदा सोडून आता त्यांनी या मतदारसंघात बस्तान बसविले असून, या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ते मंत्रालयाचे उंबरठे झिजवू लागले आहेत.
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेले सत्यजित गायकवाड हे १९९६ आणि १९९९ मध्ये बडोदा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. त्यानंतर बडोदा मतदारसंघात त्यांची डाळ शिजू शकली नाही. लागोपाठ दोनदा ते भाजपकडून पराभूत झाले.
मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर खुला झालेल्या धुळे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून जाण्याची सत्यजित गायकवाड यांची इच्छा आहे. त्यासाठी मालेगाव तालुक्यातीलकौलाने या मूळ गावात ते राहण्यासाठी आले आहेत. धुळे मतदारसंघात त्यांचा वावर अलीकडे वाढला आहे. गेल्या वेळी या मतदारसंघातून भाजपचे प्रताप सोनावणे हे निवडून आले होते. मतदारांची सेवाही सत्यजित गायकवाड यांनी सुरू केली आहे. गुरुवारी सत्यजित गायकवाड मालेगाव आणि मनमाडच्या पाण्याचा प्रश्न घेऊन मंत्रालयात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन या दोन्ही शहरांमधील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. धुळे जिल्ह्य़ात रोहिदास पाटील आणि अमरिश पटेल हे काँग्रेसमध्ये दोन गट परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी टपून बसलेले असतात. रोहिदास पाटील यांच्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात अमरिश पटेल पराभूत झाल्याचा पटेल समर्थक दावा करतात. तर पटेल यांनी विरोधात काम केल्यानेच रोहिदास पाटील यांचा विधानसभेला पराभव झाल्याचा आरोप केला जातो. या पाश्र्वभूमीवर या दोन्ही गटांना बरोबर घेण्याचे काम गायकवाड यांना करावे लागेल.
या संदर्भात सत्यजित गायकवाड यांना विचारले असता त्यांनी आपण धुळे मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यात इच्छुक असल्याचे मान्य केले. आपले मूळ गाव या मतदारसंघात आहे.  
दरम्यान, गायकवाड यांच्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यासारखे होईल, असा काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.