अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची एमार ही सरकारी कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून यासंदर्भात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कंपनीसोबत करार करण्याची प्रक्रियादेखील लवकरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.

सौदी अरेबियाची एमार कंपनी भारतात गुंतवणूक करण्यात उत्सुक असून आज दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवासन, दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला, केंद्रीय दूरसंचार विभागाचे विशेष सचिव शिवा सेलम आणि एमआर उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अन्न प्रक्रिया क्षेत्रात काम करणारी एमार ही सौदी अरेबिया सरकारची एक आघाडीची कंपनी आहे. मोदी यांनी मध्य-पूर्वेच्या दौऱ्यादरम्यान तेल सुरक्षेच्या बदल्यात अन्न सुरक्षा या सूत्रावर या कंपनीचे सहकार्य घेण्याबाबत चर्चा केली होती. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत गुंतवणूक करण्यास कंपनीने स्वारस्य दाखविले आहे.

या कंपनीचे पथक उद्या गुरुवारी मुंबईत येणार असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाचे वरिष्ठ अधिकारी इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुंतवणुकीच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत सादरीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पात आंबा, द्राक्षे, कांदा, डाळिंब, भाज्या आदी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या भागात फूड पार्क उभारल्यास शेतकऱ्यांना  त्याचा निश्चित फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महानेटसाठी खासगी नेटवर्कचा वापर

मुख्यमंत्र्यांनी दिल्ली भेटीत दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्याशीही महानेट प्रकल्पाबाबत चर्चा केली. गतिमान कार्यवाहीसाठी खासगी कंपन्यांचे फायबर नेटवर्क आणि बँडविड्थ वापरण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना केली.  यामुळे महसुली गावे, शाळा, आरोग्य केंद्र, बाजार, शेती आदी ठिकाणी नेटवर्क पोहोचून त्यांना फायदा होईल असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.