मुंबई : सुमारे चार वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘आरे वाचवा’ ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेले पर्यावरणप्रेमी गरज पडल्यास रस्त्यावर उतरायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत, हे शुक्रवारी रात्री कारशेडच्या जागेवरील वृक्षतोड विरोधाच्या निमित्ताने दिसून आले. यात आंबेडकर महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ, टाटा सामाजिक विज्ञान संस्थांसह विविध महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी, नोकरदार, वकील, आयटी क्षेत्रात काम करणारे तंत्रज्ञ, छायाचित्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी अशा अनेक स्तरांतील पर्यावरणप्रेमींचा सहभाग होता.

आरेमधील मेट्रो कारशेडच्या जागेवरील झाडे तोडण्यास सुरुवात झाल्याची पहिली चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाली. पाठोपाठ आरेमध्ये एकत्र येण्याचे संदेश फिरू लागले. त्यानंतर आरेमधील आदिवासींपासून, विरार, पनवेल येथून पर्यावरणप्रेमी तेथे दाखल झाले. ‘आरे वाचवा’ हा एका परिसराचा मुद्दा न राहता मुंबईच्या कानाकोपऱ्यातून त्याला पाठिंबा मिळाला. त्याशिवाय अटक झालेल्या पर्यावरणप्रेमींसाठी कायदेशीर मदत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्याच माध्यमातूनच मिळाली. अटक झालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या परीक्षा सोमवारपासून सुरू होणार असल्यामुळे त्यांना जामीन मिळाला. हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आणि आरेमध्येच राहणारा स्वप्निल पवार हा या आंदोलनात सामील झाला. शुक्रवारी आरेत झाडे तोडली जात असल्याची चित्रफीत त्यानेच समाजमाध्यमांवर पाठविली. आरेमध्ये राहत असल्यामुळे आरेशी निगडित आहेच, पण या आंदोलनामुळे आणखीनच सक्रिय झाल्याचे तो सांगतो.

जामिनावर सुटलेले पर्यावरणप्रेमी

कपिलदीप अग्रवाल, श्रीधर ए., संदीप परब, मनोजकुमार रेड्डी, विनित विचारे, दिव्यांग पोतदार, श्रीधर सपकाळे, विजयकुमार कांबळे, कमलेश शामनथिला, नेल्सन लोपेज, आदित्य पवार, ड्वेन राडो, रुहान अलेक्झांडर, मयूर आगरे, सागर गावडे, मनन देसाई, स्टीफन मिसाळ, स्वप्निल पवार, विनेश घोसाळकर, प्रशांत कांबळे, शशिकांत सोनवणे, आकाश पाटणकर, सिद्धार्थ अभावे, सिद्धेश घोसाळकर, श्रुती मानधवन, मीमांसा सिंग, स्वप्ना ए. स्वर, सोनाली निमाले, प्रमिला भोईर.

आंदोलकांच्या जामिनासाठी ‘क्राउड फंडिंग’

शुक्रवारी रात्रीच्या आंदोलनामध्ये २९ जणांना अटक करण्यात आली. त्यांना शनिवारी रात्री न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. या सर्वाच्या जामिनासाठी, कायदेशीर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी निधीची आवश्यकता होती. ‘आरे वाचवा आंदोलन’ ही एका संस्थेची चळवळ नसल्यामुळे या निधीच्या पूर्ततेसाठी कार्यकर्त्यांनी ‘क्राउड फंडिंग’चा पर्याय वापरला. क्राउड फंडिंगला शनिवारी सायंकाळी सुरुवात करण्यात आली आणि रविवारी सायंकाळपर्यंत सुमारे दोन लाख रुपये जमा झाले. क्राउड फंडिंगद्वारे जमा झालेला निधी खात्यावर जमा होण्यास वेळ लागणार असल्यामुळे काही पालकांनी, तसेच इतर कार्यकर्त्यांनी जामिनाच्या रकमेची तात्पुरती तरतूद केली. त्यामुळे रविवारी रात्रीच सर्व २९ आंदोलकांची सुटका झाली.