News Flash

‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र

आजही मानवी साखळी, शिवाजी पार्कला ‘निद्रा आंदोलन’

(संग्रहित छायाचित्र)

‘मेट्रो ३’ कारशेडसाठी वृक्ष हटवण्यास वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिल्यानंतर गेल्या २३ दिवसांत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वीसहून अधिक निदर्शने झाली आहेत. आरेमध्ये कारशेडजवळच सलग तीनही रविवारी मानवी साखळी करण्यात आली असून, २२ सप्टेंबरला देखील मानवी साखळी होणार आहे, तर दादर येथे शिवाजी पार्कला ‘स्लिपिंग प्रोटेस्ट’ करण्यात येणार आहे.

पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने कारशेडच्या जागेसाठी २,६४८ वृक्ष हटवण्याची परवानगी २९ ऑगस्टला दिल्यानंतर ‘आरे वाचवा’ मोहीम अधिक तीव्र झाली. वनशक्ती संस्था आणि झोरू भथेना यांच्या याचिकांवर न्यायालयात मागील आठवडाभर सुनावणी सुरू असून त्याचवेळी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकदेखील रस्त्यावर उतरून हे आंदोलन तीव्र करत आहेत.

शनिवारी सकाळी आरेमध्ये ‘रन फॉर आरे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पन्नासहून अधिक नागरिक सामील झाले होते. शुक्रवारी संध्याकाळी ‘स्प्राऊट्स’ संस्थेमार्फत दादर येथे शिवाजी पार्कला मूक निदर्शन करण्यात आले.

गेल्या पंधरा दिवसांत फ्रायडे फॉर फ्यूचर, वॉचडॉग अशा अनेक संस्था यामध्ये सक्रिय झाल्या आहेत. गुरुवारी माटुंगा येथे रुइया आणि रुपारेल महाविद्यालयांबाहेर विद्यार्थ्यांनीदेखील आरे वाचवासाठी सह्य़ांची मोहीम घेतली होती. मालाड, दादर, अंधेरी, चर्चगेट अशा रेल्वेस्थानकातदेखील चारही शुक्रवारी अनेक तरुणांनी मूक निदर्शने केली आहेत. चार वर्षांपासून अम्रिता भट्टाचार्यजी यांनी सुरू केलेल्या ‘आरे कन्झर्वशेन ग्रुप’ समाजमाध्यमावरील समूहाच्या माध्यमातून अनेक पर्यावरणप्रेमी एकत्र आले होते. त्यांची स्वतंत्र अशी संस्था न करताच ‘आरे वाचवा’ ही मोहीम सुरू असून, गेल्या २३ दिवसांत या मोहिमेला अनेक संस्थांचा तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 2:06 am

Web Title: save aarey movement is intense abn 97
Next Stories
1 ‘शोधइंडियाडॉटकॉम’विरोधात पोलीस तक्रार
2 भाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार
3 महापुराचे पूर्वानुमान सांगणारी प्रणाली तयार
Just Now!
X